Pune Crime : पुण्यात 'दृश्यम' स्टाईल खून! प्लॅन रचून शिक्षक बायकोला संपवलं, गोडाऊनमध्ये लोखंडी भट्टी तयार केली अन्...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune drishyam Style Murder : आरोपीने खेड शिवापूरजवळ गोगलवाडी येथे एक गोडाऊन भाड्याने घेतले. 26 ऑक्टोबरला तो चारचाकी गाडीतून पत्नीला गोडाऊन दाखवायला घेऊन गेला.
Pune Crime News : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी 'दृश्यम' (Drishyam) चित्रपट स्टाईलचा अवलंब करणाऱ्या पतीला पुण्याच्या वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी समीर जाधव याने पत्नी अंजली समीर जाधव यांचा गळा दाबून खून केला आणि नंतर लोखंडी भट्टी तयार करून मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर भट्टीही नष्ट केली. अंजली खासगी शिक्षिका म्हणून काम करत होत्या. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला कारण खून केल्यानंतर आरोपी समीर जाधव, जो पेशाने फॅब्रिकेशनचे काम करतो, त्याने स्वतः पोलीस स्टेशन गाठले आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
मुलं दिवाळीच्या सुट्टीमुळे गावाला
पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असता आरोपीचा बनाव उघड झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर जाधव याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, तरीही तो पत्नी अंजली यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शिवणे परिसरात राहणाऱ्या या दाम्पत्याचे 2017 मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. खुनाच्या वेळी मुले दिवाळीच्या सुट्टीमुळे गावाला गेली होती.
advertisement
एक लोखंडी भट्टी तयार केली अन्...
समीरने पूर्व नियोजित कट रचला होता. त्याने खेड शिवापूरजवळ गोगलवाडी येथे एक गोडाऊन भाड्याने घेतले. 26 ऑक्टोबरला तो चारचाकी गाडीतून पत्नीला गोडाऊन दाखवायला घेऊन गेला. त्याच ठिकाणी त्याने अंजली यांचा गळा दाबून खून केला. मृतदेह नष्ट करण्यासाठी त्याने तिथेच एक लोखंडी भट्टी तयार केली आणि मृतदेह जाळला. मृतदेहाची राख जवळच्या ओढ्यातील नदीत फेकून दिली. मृतदेह जाळण्यापूर्वी समीरने 'दृश्यम' चित्रपट तीन ते चार वेळा पाहिल्याचे समोर आले आहे.
advertisement
समीरचं बिंग फुटलं...
पत्नी मिसिंग असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी समीर जाधव वारंवार पोलीस स्टेशनला येऊन पत्नीचा शोध कधी लागेल, अशी आत्मीयतेने चौकशी करत होता. त्याच्या याच हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी तांत्रिक आणि सीसीटीव्ही तपासणी केली असता, मिसिंगच्या दिवशीचे फुटेज आणि इतर माहितीवरून समीरचे बिंग फुटले आणि या 'दृश्यम' स्टाईल खुनाचा उलगडा झाला. आरोपीविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी तो राजगड पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 09, 2025 8:38 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यात 'दृश्यम' स्टाईल खून! प्लॅन रचून शिक्षक बायकोला संपवलं, गोडाऊनमध्ये लोखंडी भट्टी तयार केली अन्...


