'पहिल्या ॲनिवर्सरीला माझ्याकडे ये'; पुण्यातील डॉक्टर पतीची कोर्टात धाव, पण पुढं भलतंच घडलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पतीने आपल्या पहिल्या ॲनिवर्सरीला पत्नीने परत यावं, यासाठी थेट कोर्टात धाव घेतली. मात्र, त्याने केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशनानंतर परस्पर संमतीने घटस्फोटाच्या अर्जात बदलला
पुणे: मोठ्या थाटामाटात विवाह झालेल्या एका पती-पत्नीच्या नात्यात कटुता निर्माण झाली. यामुळे लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत पत्नी माहेरी निघून गेली. पतीने आपल्या पहिल्या ॲनिवर्सरीला पत्नीने परत यावं, यासाठी थेट कोर्टात धाव घेतली. मात्र, त्याने केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशनानंतर परस्पर संमतीने घटस्फोटाच्या अर्जात बदलला. विशेष म्हणजे, न्यायालयाने या जोडप्याची मानसिकता आणि परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेऊन, घटस्फोटासाठी असलेला सहा महिन्यांचा अनिवार्य प्रतीक्षा कालावधीही माफ केला. कोर्टाने त्यांच्या नात्याला तातडीने अधिकृत पूर्णविराम दिला.
तीन महिन्यांत संसाराला पूर्णविराम
राहुल (डॉक्टर) आणि पुजा (आयटी कंपनीत कार्यरत) (नावं बदलली आहेत) यांचा विवाह १० सप्टेंबर २०२४ रोजी उत्साहात पार पडला होता. मात्र, संसाराची गोड सुरुवात होण्याऐवजी, अवघ्या तीन महिन्यांतच त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर खटके उडण्यास सुरुवात झाली आणि भांडणे विकोपाला गेल्याने साक्षी माहेरी परतली. आपला संसार वाचवण्यासाठी पतीने कौटुंबिक न्यायालयात 'पत्नीने परत नांदायला यावे' यासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाच्या नोटिशीनुसार साक्षी हजर झाल्यानंतर, हे प्रकरण समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं.
advertisement
समुपदेशनात टोकाचा निर्णय
समुपदेशक आणि वकिलांसमोर दोघांनी शांतपणे चर्चा केली. त्यांचे मतभेद इतके टोकाचे होते की, यापुढे एकत्र राहणं शक्य नाही, हे दोघांच्याही लक्षात आलं. जबरदस्तीने हे नातं पुढे नेल्यास मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होईल, हे त्यांनी मान्य केलं. अखेरीस, लग्नाच्या वर्षपूर्तीला पत्नी परत नांदायला येईल, अशी अपेक्षा ठेवणाऱ्या पतीने आपला सुरुवातीचा अर्ज मागे घेऊन पत्नीच्या संमतीने थेट घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.
advertisement
सहा महिन्यांची मुदतमाफी
पतीच्या बाजूने ॲड. अमित राठी आणि ॲड. प्रफुल्ल लुंकड यांनी काम पाहिलं. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की, दोघांनीही शांतपणे आणि कोणताही वाद न घालता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. नात्यातील कटुता लवकरात लवकर संपवण्यासाठी, कायद्यानुसार आवश्यक असलेला सहा महिन्यांचा अनिवार्य प्रतीक्षा कालावधी माफ करण्यात यावा.
न्यायालयाने दोन्ही पक्षांचा समंजसपणा, त्यांची परस्पर संमती आणि परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यामुळे हे जोडपे सहा महिन्यांची वाट न पाहता कायदेशीररित्या तात्काळ वेगळं झालं. पतीचे वकील ॲड. अमित राठी यांनी सांगितले की, मतभेद टोकाचे असतानाही दोघांनी शांत मनाने, सन्मानाने आणि सहमतीने नात्याला पूर्णविराम देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 13, 2025 11:50 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'पहिल्या ॲनिवर्सरीला माझ्याकडे ये'; पुण्यातील डॉक्टर पतीची कोर्टात धाव, पण पुढं भलतंच घडलं









