Pune News: सावधान! पुण्यात झाडाची सावली शोधताय? 44 हजार 500 झाडं 'मृत्यूचा सापळा'; FC रोडवरील 'तो' थरार पाहून सगळे हादरले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
भर उन्हात थंडावा मिळावा म्हणून झाडाच्या सावलीत उभे राहणे पुणेकरांच्या जीवावर बेतू शकते, असाच एक थरार फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर (FC Road) अनुभवायला मिळाला
पुणे: भर उन्हात थंडावा मिळावा म्हणून झाडाच्या सावलीत उभे राहणे पुणेकरांच्या जीवावर बेतू शकते, असाच एक थरार फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर (FC Road) अनुभवायला मिळाला. बुधवारी सकाळी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पाच-सहा विद्यार्थिनी गप्पा मारत उभ्या असताना, एका महाकाय झाडाची फांदी थेट त्यांच्या समोर कोसळली. सुदैवाने, या मुली अवघ्या एक-दोन पाऊल अंतरावर असल्याने 'नशीब बलवत्तर' म्हणून त्यांचा जीव वाचला. मात्र, या घटनेने शहरातील ४४ हजारांहून अधिक धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शहरात झाडांचे 'बळी' सत्र सुरूच
महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या २०२५ च्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात एकूण ५८ लाख ५६१ झाडे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, त्यापैकी तब्बल ४४ हजार ५०० झाडे अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. गेल्या ५ वर्षांत झाडपडीच्या घटनांमुळे ६८ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकजण कायमचे अपंग झाले आहेत. बिबवेवाडी आणि पेशवे उद्यानाजवळ अलीकडेच झालेल्या मृत्यूच्या घटनांनी पुणेकर आधीच दहशतीत आहेत.
advertisement
झाडे कमकुवत का होत आहेत?
शहरातील झाडे मुळापासून खिळखिळी होण्यामागे काही प्रमुख कारणे समोर आली आहेत. यातीलच एक म्हणजे खोदकामाचा अतिरेक: गॅस पाईपलाईन, केबल आणि रस्ते कामांसाठी जेसीबी आणि पोकलँडच्या सहाय्याने मुळांजवळ होणाऱ्या खोदकामामुळे झाडांची पकड ढिली झाली आहे. अशास्त्रीय छाटणी: महावितरण आणि इतर कंपन्यांकडून ओव्हरहेड केबलसाठी झाडांच्या फांद्या एकाच बाजूने तोडल्या जातात. यामुळे झाडाचा भार एकाच दिशेने झुकतो आणि वादळ किंवा पावसात ही झाडे कोसळतात.
advertisement
वृक्ष समिती काय करतेय?
शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात धोकादायक झाडे असताना महापालिकेची वृक्ष समिती आणि उद्यान विभाग काय करत आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. उन्हाळा संपताना वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने, पालिकेने तातडीने या धोकादायक फांद्यांची आणि झाडांची विल्हेवाट लावण्याची गरज आहे, अन्यथा पावसाळ्यात मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 6:47 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: सावधान! पुण्यात झाडाची सावली शोधताय? 44 हजार 500 झाडं 'मृत्यूचा सापळा'; FC रोडवरील 'तो' थरार पाहून सगळे हादरले









