Pune Festival: जुळ्यांचा मेळा! 75 वर्षांचे जुळे अन् 50 हून अधिक जोड्या, पुणे फेस्टिव्हलमध्ये हे पहिल्यांदाच घडलं, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Festival: गेल्या 37 वर्षांपासून मोठ्या उत्साहात पुणे फेस्टिव्हल साजरा होत आहे. यंदा या फेस्टिव्हलमध्ये जुळ्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते.
पुणे: संमेलन म्हटले की आपल्या मनात लगेच साहित्य, काव्य, नाट्य अशा पारंपरिक संमेलने येतात. मात्र यंदा पुणे फेस्टिवलमध्ये एक वेगळा आणि अनोखा उपक्रम राबवण्यात आला. जुळ्या व्यक्तींचे संमेलन. पुण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे संमेलन आयोजित करण्यात आले आणि हा उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.
पुणे फेस्टिवलची सुरुवात खासदार सुरेश कलमाडी यांच्या संकल्पनेतून झाली होती आणि यंदा या उत्सवाचे 37 वे वर्ष आहे. गेल्या तीन दशकांपासून या उत्सवात विविध सांस्कृतिक, कलात्मक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. यावर्षी मात्र जुळ्यांच्या संमेलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या संमेलनामागील कल्पना कशी सुचली याबद्दल आयोजक प्रवीण वाळिंबे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले, केरळमधील एका छोट्या गावाबद्दल आम्ही वाचले होते, कोडिन्ही गावात जिथे मोठ्या प्रमाणात जुळी मुले जन्माला येतात आणि तिथे असे संमेलन होते. त्यातूनच प्रेरणा घेऊन पुण्यातही अनेक जुळी मुले आणि प्रौढ आहेत, त्यांना एकत्र आणले तर हा एक वेगळा आनंदसोहळा होईल, अशी कल्पना सुचली.
advertisement
या संमेलनात 50 जुळ्या जोड्यांचा म्हणजेच 100 लोकांचा सहभाग होता. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटातील जुळे एकत्र आले होते. विशेष म्हणजे 1 ते 15 वयोगटातील मुलांचा सहभाग सर्वाधिक होता, तर 75 वर्षांचे ज्येष्ठ जुळेही या सोहळ्यात सहभागी झाले. बहीण-भावाची जोडी, दोन बहिणी, दोन भाऊ अशा सर्व प्रकारच्या जोड्या येथे पाहायला मिळाल्या.
advertisement
जुळे लोक एकत्र आल्याने फक्त आनंदसोहळाच झाला नाही तर त्यांना एकमेकांशी अनुभव शेअर करण्याची संधीही मिळाली. जुळे असण्याचे फायदे आणि अडचणी या संदर्भातही चर्चा झाली. लहान मुलांनी वेगवेगळे खेळ खेळले, तर मोठ्यांनी आपापल्या आठवणी सांगत आनंद लुटला. या कार्यक्रमासाठी विशेष मंच तयार करण्यात आला होता आणि सहभागींसाठी छायाचित्रण, सांस्कृतिक कार्यक्रम यांचीही सोय करण्यात आली होती.
advertisement
या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता आयोजकांनी पुढील वर्षांमध्ये हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणावर करण्याचा मानस व्यक्त केला आहे. प्रवीण वाळिंबे म्हणाले, “ही फक्त सुरुवात आहे. जुळे लोक आपापल्या अडचणींवर चर्चा करू शकतात, एकमेकांना मदत करू शकतात, हा उद्देशही यामागे आहे. पुढील वर्षी आम्ही अधिक जुळ्या जोड्यांचा सहभाग मिळवण्यासाठी प्रयत्न करू.”
advertisement
पुणे फेस्टिवलमध्ये यंदाही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले, परंतु जुळ्या व्यक्तींचे हे संमेलन हा या वर्षीचा सर्वात चर्चेचा विषय ठरला. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आयोजकांच्या या अनोख्या कल्पनेचे कौतुक केले. संमेलने केवळ साहित्य किंवा कला यापुरती मर्यादित राहू नयेत, तर समाजातील विविध गटांना एकत्र आणणारे उपक्रम व्हावेत, असा संदेशही या उपक्रमाने दिला. जुळ्या व्यक्तींच्या आनंदासाठी, संवादासाठी आणि सहकार्यासाठी हे पहिले पाऊल यशस्वी ठरले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 04, 2025 11:40 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Festival: जुळ्यांचा मेळा! 75 वर्षांचे जुळे अन् 50 हून अधिक जोड्या, पुणे फेस्टिव्हलमध्ये हे पहिल्यांदाच घडलं, Video