Pune Accident: हृदयद्रावक! मुलाच्या डोळ्यादेखत आईच्या छातीवरून गेलं टेम्पोचं चाक; पुण्याच्या कर्वे रोडवर भयानक अपघात
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
चप्पल दुरुस्ती करून आपल्या वृद्ध आईचा सांभाळ करणाऱ्या तुळशीदास शिंदे यांच्या डोळ्यांसमोर, त्यांच्या काळजाचा तुकडा असलेल्या ६१ वर्षीय सीताबाई शिंदे यांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला.
पुणे: कर्वे रोडवरील गांधी भवन चौकात मंगळवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास काळाने अशी झडप घातली की, एका मुलाचं संपूर्ण आयुष्यच अंधकारमय झालं. चप्पल दुरुस्ती करून आपल्या वृद्ध आईचा सांभाळ करणाऱ्या तुळशीदास शिंदे यांच्या डोळ्यांसमोर, त्यांच्या काळजाचा तुकडा असलेल्या ६१ वर्षीय सीताबाई शिंदे यांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. आईच एकमेव आधार होती आणि त्या आधारस्तंभाचा अंत होताना पाहण्याचे दुर्दैव मुलाच्या नशिबी आले.
तुळशीदास (३८) हे चप्पल विक्री आणि दुरुस्तीचा व्यवसाय करून कष्टातून आपला संसार चालवतात. गेल्या १० वर्षांपासून ते आईसोबत कर्वेनगर परिसरात राहत होते. मंगळवारी सकाळी स्वतःच्या वैद्यकीय तपासणीसाठी ते आईला सोबतीला घेऊन दुचाकीवरून निघाले होते. दोघांच्याही मनात घराबाहेर पडताना साधी कल्पनाही नसेल की, हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार आहे.
तो एक 'कट' अन् होत्याचं नव्हतं झालं...
जलसा हॉटेलसमोरील सिग्नल नुकताच सुटला होता. समोरून अचानक एका दुचाकीस्वाराने नियमांचे उल्लंघन करत निष्काळजीपणे वळण घेतले. या दुचाकीचा धक्का लागताच शिंदे यांची गाडी घसरली. दुर्दैवाने सीताबाई उजव्या बाजूला पडल्या आणि त्याच क्षणी शेजारून जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरचे चाक त्यांच्या छातीवरून गेले. मुलाच्या डोळ्यांदेखत रक्ताचा सडा पडला होता. तुळशीदास यांनी तातडीने आईला उचलून रुग्णालय गाठले, पण ससून रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
advertisement
अंत्यविधी उरकले अन् फिर्याद दिली
ज्या आईने लहानाचं मोठं केलं, त्याच आईचे अंत्यसंस्कार करण्याचं आभाळाएवढं दुःख तुळशीदास यांनी पचवलं. साश्रू नयनांनी आईला निरोप दिल्यानंतर त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात जाऊन त्या अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात तक्रार दिली, ज्याच्या एका चुकीच्या वळणामुळे आज त्यांच्या डोक्यावरचं छत्र हरपलं.
अनोळखी दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला असला, तरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मात्र, पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यांवरील ही 'वेगाची नशा' आणि 'नियम मोडण्याची सवय' आणखी किती गरिबांचे संसार उद्ध्वस्त करणार? असा संतप्त सवाल या घटनेनंतर विचारला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 8:04 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident: हृदयद्रावक! मुलाच्या डोळ्यादेखत आईच्या छातीवरून गेलं टेम्पोचं चाक; पुण्याच्या कर्वे रोडवर भयानक अपघात







