Pune Crime: दरवाजा वाजवला; तरुणीने उघडताच दोघं घरात घुसले अन्...कोरेगाव पार्कमधील घटनेनं खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
दोन अज्ञात व्यक्तींनी तरुणीच्या घराचा दरवाजा वाजवून आत प्रवेश केला. तिने दरवाजा उघडताच तिला चाकूचा धाक दाखवला आणि ...
पुणे : पुणे शहरात गुन्हेगारांचे धाडस वाढले असून, भरवस्तीत घरफोडी आणि लुटमारीच्या दोन गंभीर घटनांनी खळबळ उडाली आहे. कोरेगाव पार्क आणि सदाशिव पेठ यांसारख्या उच्चभ्रू परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे.
घरात घुसून तरुणीला चाकूचा धाक
पुण्यातील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमधील गल्ली क्रमांक ५ मध्ये एका तरुणीवर प्राणघातक हल्ला करून लुटमार करण्यात आली. दोन अज्ञात चोरट्यांनी तरुणीच्या घराचा दरवाजा वाजवून आत प्रवेश केला. तिने दरवाजा उघडताच चोरट्यांनी तिला चाकूचा धाक दाखवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. चोरट्यांनी तिला कपाट उघडायला लावून त्यातील ११ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले. या कृत्याला विरोध केला असता, आरोपींनी तरुणीला बेदम मारहाण केली, ज्यात ती जखमी झाली आहे. घटनेनंतर चोरटे पसार झाले. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू आहे.
advertisement
ज्येष्ठ नागरिकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले
दुसरी घटना सदाशिव पेठेतील लिमयेवाडी परिसरात घडली. एका ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी अडवले. चोरट्यांनी आपले चेहरे झाकले होते आणि हल्ला करण्याची भीती दाखवून त्यांना धमकावले. चोरट्यांनी त्यांच्याकडील रोकड आणि सोन्याची अंगठी असा ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विश्रामबाग पोलीस या प्रकरणातील १८ ते २० वयोगटातील आरोपींचा शोध घेत आहेत.
advertisement
पुण्यातील या लागोपाठच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 10:18 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: दरवाजा वाजवला; तरुणीने उघडताच दोघं घरात घुसले अन्...कोरेगाव पार्कमधील घटनेनं खळबळ









