काँग्रेसचा बालेकिल्ला ते भाजपचं वर्चस्व; पुणे महापालिकेच्या सत्तेचा प्रवास, पाहा आताची राजकीय समीकरणं, Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- local18
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
पूर्वी काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजप असा सत्तेचा प्रवास पुणे महापालिकेने अनुभवला आहे. बदलत्या सत्तासमीकरणांमुळे यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
पुणे : पुणे महापालिका निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले असून निवडणुकीच्या तयारीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या निवडणुका होत असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रभागनिहाय हालचाली वाढल्या असून गल्लोगल्ली राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सर्वच प्रमुख राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वी काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजप असा सत्तेचा प्रवास पुणे महापालिकेने अनुभवला आहे. बदलत्या सत्तासमीकरणांमुळे यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
पुणे महापालिकेवर दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता होती. त्या काळात काकासाहेब गाडगीळ, सुरेश कलमाडी यांसारखे दिग्गज नेते शहराच्या राजकारणात प्रभावी होते. त्यांची स्वतंत्र ओळख आणि जनाधार काँग्रेसला मजबूत ठेवणारा होता. मात्र कालांतराने काँग्रेसची घसरण सुरू झाली. 1999 मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाल्यानंतर सर्वाधिक फटका काँग्रेसलाच बसला. पुण्यातील अनेक कार्यकर्ते आणि इच्छुक नेते राष्ट्रवादीकडे वळले आणि महापालिकेतील सत्तांतर घडले.
advertisement
दरम्यान, कॉमनवेल्थ घोटाळ्यात सुरेश कलमाडी अडकल्याने त्यांना कारावास भोगावा लागला. पुण्यातील सक्षम नेतृत्व म्हणून ओळख असलेले कलमाडी राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला गेल्यानंतर काँग्रेसला शहरात तितकेच ताकदीचे नेतृत्व उभे करता आले नाही. कार्यकर्त्यांशी जोडलेले, त्यांच्या समस्या जाणून घेणारे नेतृत्व अभावानेच दिसू लागले. परिणामी काँग्रेसची पकड हळूहळू सैल होत गेली.
2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपचा जोरदार उदय झाला. भाजपला एकहाती बहुमत मिळाले आणि तब्बल 98 नगरसेवक निवडून आले. पुण्यात भाजपचा ‘राज’ सुरू झाला, असे म्हणावे लागेल. 2017 ते 2022 हा कार्यकाळ संपल्यानंतर पुणे महापालिकेत साडेतीन वर्षे प्रशासक राजवट राहिली. कोरोना महामारी, जनगणनेचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि राज्यातील इतर राजकीय घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या.
advertisement
या विलंबाचा फटका माजी नगरसेवकांना बसला. निवडणुका कधी होतील याची शाश्वती नसल्याने अनेक नगरसेवक नागरिकांशी असलेली सातत्यपूर्ण संपर्कसाखळी टिकवू शकले नाहीत. सत्तेत असताना विकासकामे करता येतात, नागरिकांशी थेट नाते ठेवता येते मात्र दीर्घकाळ निवडणुका न झाल्याने अनेक जण राजकीय प्रवाहाबाहेर फेकले गेले.
इतर पक्षांचा विचार करता शिवसेनेतील फूटीनंतर उद्धव ठाकरे गटाला सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र आहे. सध्या ठाकरे गटाकडे पुण्यात केवळ एकच माजी नगरसेवक उरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या मोठी असल्याने महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत आहेत.
advertisement
2017 च्या निवडणुकीत भाजपला 98, राष्ट्रवादीला 41, काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी 10, मनसेला 2तर एमआयएमला 1 जागा मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत हे समीकरण कसे बदलते, भाजप आपले वर्चस्व टिकवतो की विरोधकांना पुनरागमनाची संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग सांडभोर यांनी दिली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 1:58 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
काँग्रेसचा बालेकिल्ला ते भाजपचं वर्चस्व; पुणे महापालिकेच्या सत्तेचा प्रवास, पाहा आताची राजकीय समीकरणं, Video









