Pune News: पालकांनो सावधान! पतंग उडवायला गेला अन् जीव गमावला; पुण्यातील 12 वर्षांच्या श्लोकसोबत भयंकर घडलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
१२ वर्षांचा श्लोक बांदल हा पतंग उडवण्यासाठी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर गेला होता, मात्र जिन्याला कठडे नसल्याने त्याचा सहाव्या मजल्यावरून तोल गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे
पुणे : पुण्यातील कात्रज-आंबेगाव खुर्द परिसरात पतंग उडवताना एका १२ वर्षीय मुलाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. श्लोक नितीन बांदल असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (८ जानेवारी) सायंकाळी शाळा सुटल्यानंतर श्लोक घराशेजारीच सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पाच्या इमारतीमध्ये पतंग उडवण्यासाठी गेला होता. ही इमारत सहा मजली असून तिचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नव्हते. पतंग उडवण्याच्या नादात श्लोकचा तोल गेला आणि तो थेट सहाव्या मजल्यावरून खाली कोसळला. उंचावरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
या घटनेनंतर श्लोकचे मामा अमोल इंगवले यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. "इमारतीचे बांधकाम सुरू असताना तिथे सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नव्हत्या. इमारतीच्या जिन्यांना कठडे (पॅरापेट वॉल) नसल्याने श्लोकचा तोल जाऊन तो खाली पडला," असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि कठडे असते, तर हा अपघात टळला असता, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
advertisement
या तक्रारीची दखल घेत आंबेगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक योगेश शिळीमकर आणि महेश धूत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या संक्रांतीचा काळ असल्याने लहान मुले छतावर पतंग उडवण्यासाठी गर्दी करत आहेत. अशा वेळी पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे आणि बांधकाम व्यावसायिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 6:44 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पालकांनो सावधान! पतंग उडवायला गेला अन् जीव गमावला; पुण्यातील 12 वर्षांच्या श्लोकसोबत भयंकर घडलं










