नशीब फुटलं! 'वेल सेटल' असूनही लग्नं मोडली, बिबट्याच्या भीतीने सोयरिकच होईना, शेकडो तरुण बिनलग्नाचे!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune News: बिबट्याच्या दहशतीचा फटका मुलांच्या लग्नांनाही बसत आहे. पुण्यातील शिरुर, आंबेगाव परिसरात ठरलेली लग्ने मोडत आहेत.
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यांतील ग्रामीण भागात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसरात्र भीतीच्या छायेत जगणाऱ्या ग्रामस्थांवर आता या दहशतीचा परिणाम सामाजिक आयुष्यावरही होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, या भीतीमुळे शेकडो तरुणांची लग्नं रखडली असून अनेक सोयरिका तुटल्या आहेत.
गावात बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे मुलींच्या पालकांकडून या भागात मुली देण्यास सरळ नकार दिला जात आहे. परिणामी वेल सेटल असूनही अनेक तरुण अविवाहित राहिले आहेत. आई-वडील आपल्या लेकरांच्या संसाराच्या गाठी बांधण्यासाठी चिंतेत आहेत, तर मुलंही लग्नाची स्वप्नं पाहत असताना निराशेच्या गर्तेत सापडली आहेत.
advertisement
गेल्या काही महिन्यांत या तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी जनावरे, पाळीव प्राणी आणि माणसांवरही हल्ले झाले आहेत. काहींचा जीवही गेला आहे. रात्रीच नव्हे तर आता दिवसा देखील बिबट्या वावरताना दिसतो, यामुळे नागरिकांना घराबाहेर पडायलाही भीती वाटते. शेतीकाम, गुरे चारणं किंवा शाळेत जाणं प्रत्येक हालचालीवर सावलीसारखी बिबट्याची भीती आहे.
advertisement
या भीतीमुळे सामाजिक जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक गावांमध्ये विवाहाचे प्रस्ताव थांबले असून मुलींचे पालक बिबट्यांच्या गावात मुलगी देणार नाही असा ठाम निर्णय घेत आहेत. काही ठिकाणी ठरलेली लग्नं शेवटच्या क्षणी मोडली गेल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. परिणामी या भागातील तरुणांची लग्नं रखडली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
advertisement
दरम्यान, बिबट्यांच्या दहशतीमुळे मुलांमध्ये आणि महिलांमध्येही मानसिक ताण निर्माण झाला आहे. गावातील शाळांमध्ये उपस्थिती कमी झाली आहे, तर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शहरातून गावाला येणारी भाची-बांधव मंडळी सुद्धा आता मामाचं गाव नको असं म्हणू लागली आहेत.
याच दरम्यान कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क परिसरात उच्चभ्रू वसाहतीत घुसलेल्या बिबट्याला दोन ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर पकडण्यात आले. या कारवाईदरम्यान दोन पोलीस आणि दोन वनअधिकारी जखमी झाले.
advertisement
या सर्व घटनांमुळे बिबट्यांचा वाढता वावर राज्यभर गंभीर चिंता निर्माण करत आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, सुरक्षिततेसाठी पिंजरे, सीसीटीव्ही आणि प्रकाशयोजना वाढविण्याची गरज व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील ही भीती केवळ प्राणघातक नाही, तर सामाजिक जीवनावरही गडद सावली टाकणारी ठरत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 12, 2025 10:31 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
नशीब फुटलं! 'वेल सेटल' असूनही लग्नं मोडली, बिबट्याच्या भीतीने सोयरिकच होईना, शेकडो तरुण बिनलग्नाचे!


