Pune News: शेतात दिसले दोन व्यक्ती; हालचाली पाहून संशय, गावकऱ्यांनी घेरताच अजब खुलासा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शुक्रवारी सकाळी करंदी येथील रहिवासी बाबूराव काटे हे आपल्या शेताकडे जात होते. यावेळी त्यांना कविता गायकवाड यांच्या शेतात दोन अनोळखी व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसल्या.
पुणे : शिरूर तालुक्यातील करंदी परिसरात चंदनाची झाडे तोडणाऱ्या दोन अट्टल चोरांना स्थानिक नागरिकांनी धाडसाने रंगेहात पकडलं. ग्रामस्थांनी केवळ चोरांनाच पकडलं नाही, तर त्यांच्याकडील दुचाकी आणि चंदन तोडण्याची हत्यारेही पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. या कारवाईमुळे परिसरात नागरिकांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.
असा झाला चोरांचा पर्दाफाश
शुक्रवारी सकाळी करंदी येथील रहिवासी बाबूराव काटे हे आपल्या शेताकडे जात होते. यावेळी त्यांना कविता गायकवाड यांच्या शेतात दोन अनोळखी व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसल्या. बारकाईने पाहिले असता, ते दोघे चंदनाची झाडे तोडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काटे यांनी वेळ न घालवता तातडीने ही माहिती गावातील इतर तरुणांना आणि ग्रामस्थांना दिली.
advertisement
ग्रामस्थांनी लावला सापळा
माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन्ही चोरट्यांना घेराव घालून पकडले. पकडलेले दोन्ही आरोपी शेजारील जिल्हयातील (अहिल्यानगर) असून, ते खास चंदन चोरीसाठी या भागात आले होते. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती शिक्रापूर पोलिसांना दिली आणि आरोपींना त्यांच्या स्वाधीन केले.
advertisement
आरोपींना अटक
बाबूराव काटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिक्रापूर पोलिसांनी राहुल प्रभू गव्हाणे (वय २१) आणि हनुमंत अंबादास गव्हाणे (वय २५, दोघेही रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि झाडे तोडण्याची अवजारे जप्त करण्यात आली आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 1:11 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: शेतात दिसले दोन व्यक्ती; हालचाली पाहून संशय, गावकऱ्यांनी घेरताच अजब खुलासा








