कचरा वेचणाऱ्या महिलेचं आभाळाएवढं मोठं मन! सदाशिव पेठेत कचऱ्यात सापडले 10 लाख रूपये, अन् मग...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
Pune News: रस्त्यावर कचऱ्यात सापडलेली तब्बल दहा लाख रुपये ठेवलेली पिशवी कचरावेचक अंजू माने यांनी परत केली.
पुणे : अनेकदा आपल्या आसपास अशा काही घटना पाहायला मिळतात, ज्या पाहताच असं जाणवतं की माणुसकी अजूनही जिवंत आहे. आजकाल प्रामाणिक माणसं फार कमीच पाहायला मिळतात. आता पुण्यातून असाच एका महिलेचा प्रामाणिकपणा दाखवणारी घटना समोर आली आहे. सदाशिव पेठेत ही घटना घडली आहे. यात रस्त्यावर कचऱ्यात सापडलेली तब्बल दहा लाख रुपये ठेवलेली पिशवी कचरावेचक अंजू माने यांनी परत केली.
कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी कचरा वेचणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या कचरावेचक अंजू माने सदाशिव पेठेतील काही गल्ल्यांमध्ये नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता दारोदार जाऊन कचरा गोळा करत होत्या. संकलित झालेला कचरा फिडर पॉईंटला आणताना त्यांना संकलन केंद्राजवळ कचऱ्यात एक मोठी पिशवी दिसली. ती गल्ली औषधांच्या दुकांनांची आहे. त्यामुळे अनेकदा तिथे औषधांची पाकिटं सापडतात. ही पाकिटं दिवसभरात लोक शोधत येतात. याआधीही अशाप्रकारे लोक औषधाच्या पिशवीचा शोध घेत आल्याचा अनुभव अंजूताईंना होता. त्यामुळे त्यांनी पिशवीचा मालक तिचा शोध घेत येईल, असा विचार करून पिशवी संकलन केंद्रात सुरक्षित ठेवली.
advertisement
काही वेळानंतर जेव्हा त्यांनी पिशवी उघडली तेव्हा त्यात मोठी रक्कम पाहून त्या थक्क झाल्या. अंजूताई तिथे 20 वर्षांपासून काम करतात. त्यामुळे वर्षे परिसरातील सर्व नागरिकांना ओळखतात. त्यांनी परिसरातील सगळ्यांशी संपर्क साधत ओळखीतील नागरिकांच्या मदतीने एवढी मोठी रक्कम हरवलेली कोणाची आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शोध मोहीम सुरूच ठेवली.
advertisement
दरम्यान, एक व्यक्ती त्याच रस्त्यावर काही तरी शोधत असल्याचं त्यांना दिसलं. अंजूताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बोलावून चौकशी केली असता सापडलेली पिशवी त्यांचीच असल्याचं समोर आलं. यानंतर त्यांनी दहा लाख रुपये आणि औषधांची ती पिशवी त्या व्यक्तीला सोपवली.
अंजूताईंच्या या प्रामाणिकपणाने सगळ्यांचं मन जिंकलं. साडी आणि काही रोख रक्कम भेट देत त्या व्यक्तीनेही परिसरातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत अंजूताईंच्या गेल्या वीस वर्षांपासूनच्या कामाचं आणि प्रामाणिकपणाचं मनापासून कौतुक केलं.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 22, 2025 9:38 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
कचरा वेचणाऱ्या महिलेचं आभाळाएवढं मोठं मन! सदाशिव पेठेत कचऱ्यात सापडले 10 लाख रूपये, अन् मग...


