Nagpanchami 2025 : नागपंचमीला स्वयंपाक घरात टाळतात चिरणे अन् लाटणे, सांगलीतील ही अनोखी परंपरा काय?, Video
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा सुरू झाली होती. आजही शिराळ्यातील महिला नागाला आपला भाऊ मानतात. नागाचा उपवास करतात.
सांगली: दहाव्या अकराव्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज लोकांचे प्रबोधन करत शिराळ्यात आले होते. श्रावण शुद्ध पंचमी दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते महाजनांच्या घरी गेले. त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती. भिक्षा द्यायला वेळ का झाला? या गोरक्षनाथांच्या प्रश्नावर तिने नाग पूजेचे कारण सांगितले. त्यावेळी मातीच्या नागाऐवजी जिवंत नागाची पूजा करशील का? असे विचारताच तिने होकार दिला. तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा सुरू झाली होती. आजही शिराळ्यातील महिला नागाला आपला भाऊ मानतात. नागाचा उपवास करतात.
नागोबा सूक्ष्म रूपाने घरात येईल अशी आमची भावना आहे. त्यास कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून नागपंचमी दिवशी स्वयंपाकात काहीही चिरणे, लाटणे टाळण्याची पूर्वीपासूनची रूढ आहे. आजही आम्ही नागपंचमीच्या दिवशी काही चिरत, भाजत आणि लाटत देखील नाही, असे रंजना गायकवाड यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
चिरण्या, लाटण्या आणि भाजण्यासंबंधितचे पदार्थ नागपंचमीपूर्वी एक दिवस बनवले जातात. तसेच नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये भात, शिरा असे साधे जेवण बनवत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
21 भाज्यांचा नैवेद्य
advertisement
शिराळ्यातील कोतवाल कुटुंबीय चवळी, मेथी, शेपू, तांबडा, भोपळा, भोपळीची भाजी, राजगिरा, शेवगा, वांगी, दोडका, भेंडी, गवारी, श्रावण घेवडा, वाटाणा, वरणा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मुळा, आळूवाडी, बिन, लोणचे, अशा 21 भाज्यांचा नैवेद्य नागाला दाखवतात.
advertisement
म्हणून आजही होते तुळईची पूजा
कोतवाल कुटुंबातील महिला सकाळी सहा वाजता वारुळ पूजा करून नंतर अंबाबाई मंदिरात पूजेला जातात. त्यानंतर घरी नागाच्या तुळईची पूजा करतात. रामचंद्र व तुकाराम कोतवाल यांच्या घरात एक वर्षी कुठेच नाग सापडला नाही. नैवेद्य तयार होता, पण नाग नसल्याने नैवेद्य कोणाला दाखवायचा या विवंचनेत कुटुंब असताना अचानक तुळईवर नाग आला. त्याच ठिकाणी नागाची पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. अशी आख्यायिका आहे. त्यावेळेपासून अद्याप नागाची तुळईची म्हणून पूजा केली जाते. येथील मातीच्या मनाच्या नागाची पूजा केल्याशिवाय महिला उपवास सोडत नाहीत.
advertisement
बत्तीस शिराळ्यातील महिला नागाला आपला भाऊ मानतात आणि त्याच्यासाठी श्रद्धेने उपवास करतात. नागपंचमीच्या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये, यासाठी स्वयंपाकगृहात काही चिरले जात नाही किंवा तळले जात नाही.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Jul 28, 2025 1:02 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Nagpanchami 2025 : नागपंचमीला स्वयंपाक घरात टाळतात चिरणे अन् लाटणे, सांगलीतील ही अनोखी परंपरा काय?, Video








