Ganesh Jayanthi 2024: माघी गणेशोत्सव, श्रीगणेश जयंतीचे धार्मिक महत्त्व काय? अशी आहे आख्यायिका
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Maghi Ganesh Jayanthi 2024: दिवोदास नावाचा राजा काशीमध्ये राहून राज्य करीत होता. विश्वेश्वरादी देव या पृथ्वीचा त्याग करून मंदारचलावर निघून गेले. परंतु, काशी नगरीचा विरह शंकरांना सहन झाला नाही.
मुंबई : श्रीगणेश जयंतीच्या दिवशी ढुंढिराज गणपतीच्या उद्देशाने नक्तव्रत करण्यास सांगण्यात आले आहे. गणेशाला ढुंढिराज हे नाव कसे पडले, याविषयी स्कंदपुराणात एक कथा आहे. श्रीगणेश जयंतीचे धार्मिक महत्त्व, कथा याविषयी ज्येष्ठ ज्योतिषतज्ज्ञ दा.कृ.सोमण यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिलेली माहिती जाणून घेऊ.
दिवोदास नावाचा राजा काशीमध्ये राहून राज्य करीत होता. विश्वेश्वरादी देव या पृथ्वीचा त्याग करून मंदारचलावर निघून गेले. परंतु, काशी नगरीचा विरह शंकरांना सहन झाला नाही. त्यामुळे दिवोदासाला विघ्न निर्माण करण्यासाठी शंकरांनी योगिनी गण, सूर्य, ब्रह्मदेव आणि इतर गण यांना काशीला पाठवले. त्यानंतर शंकरानी गणेशाला बोलाविले आणि सांगितले, “तू आपल्या गणांसह काशीला जा आणि आपले वास्तव्य निर्विघ्न होईल, असे विघ्न तू दिवोदासाच्या राज्यांत निर्माण कर."
advertisement
ही आज्ञा घेऊन गणेश काशी नगरीत आले. काशीत आल्यावर गणेशाने ज्योतिषाचे रूप घेतले. त्याने तेथे स्वत:ची माया निर्माण केली. ज्योतिषामुळे लोकांना मोह निर्माण होई. राजाच्या अंत:पुरातही गणेशाने ज्योतिषामुळे प्रवेश मिळवून घेतला. यथावकाश दिवोदास आणि त्याची भेट झाली. ज्योतिषी स्वरूपात वावरणाऱ्या गणेशाने त्याचे भविष्यही सांगितले. त्यामुळे दिवोदासाचे काशी नगरीतून उच्चाटन झाले. मंदार पर्वतावरून शंकराचे काशी नगरीत आगमन झाले. त्यामुळे शंकर गणेशावर प्रसन्न झाले. त्याची स्तुती करू लागले. त्यावेळी त्यांनी गणेशाला ढुंढिराज हे नाव बहाल केले. त्यावेळपासून ढुंढिविनायक काशी क्षेत्रात प्रसिद्ध झाला.
advertisement
माघ शुक्ल चतुर्थीला म्हणजेच श्रीगणेश जयंतीच्या दिवशी ढुंढिराज गणेशाला तिळसाखरेचे मोदक अर्पण करून तिळाच्या आहुती देण्यास सांगण्यात आले आहे. एकभुक्त राहून रात्री जागरण करावे, असेही सांगण्यात आले आहे. गणेशाने राक्षस नरांतकाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या पोटी ‘विनायक' नावांने अवतार घेतला म्हणून ही माघ शुक्ल चतुर्थी प्रसिद्ध आहे. आपणही आपल्यामधील आळस, अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा, अनीती इत्यादी राक्षसांचा नाश करण्यासाठी या श्रीगणेश जयंतीच्या दिवशी निश्चय करूया. माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा (Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 13, 2024 10:21 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganesh Jayanthi 2024: माघी गणेशोत्सव, श्रीगणेश जयंतीचे धार्मिक महत्त्व काय? अशी आहे आख्यायिका