शारदीय नवरात्रौत्सव केव्हापासून होतोय सुरू? यंदा काय असेल देवीचं वाहन?
- Published by:Meenal Gangurde
- local18
Last Updated:
धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची पूजा केल्याने देवीचा आशीर्वाद कायम राहतो.
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र धूम दिसत आहे. हा उत्सव सर्वत्र आनंदाने साजरा होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी साकारलेले भव्य-दिव्य देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. गणेशोत्सवाची सांगता येत्या गुरुवारी (28 सप्टेंबर 2023) होत आहे. त्यानंतर 15 दिवसांनी येणाऱ्या नवरात्रीचे वेध सर्वांना लागतील. देशभर नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो.
नवरात्र हा शक्तिपूजनाचा मोठा उत्सव आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भाविक मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करतात. वर्षभरात एकूण चार नवरात्री होतात. ज्यामध्ये चैत्र आणि शारदीय नवरात्रीसह आणखी दोन नवरात्रींचा समावेश होतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार अश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला नवरात्र उत्सव सुरू होतो. देवीची पूजा व आराधनेसाठी हा काळ सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. या काळात देवीची पूजा केल्याने रखडलेली सर्व कामं मार्गी लागतात, अशी मान्यता आहे.
advertisement
काशीचे ज्योतिषी स्वामी कन्हैया महाराज यांनी सांगितलं, की 'या वेळी शारदीय नवरात्रौत्सव 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत आहे. नवरात्र उत्सवाची समाप्ती 24 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. या नवरात्रीत देवीचं आगमन हत्तीवर, तर प्रस्थान कोंबड्यावर होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार देवीचं हत्तीवर आगमन होणं अत्यंत शुभ असते. हे वैभव आणि प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. यंदा देवी कोंबड्यावर स्वार होऊन प्रस्थान करणार आहे, हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते, अराजकता निर्माण होऊ शकते.'
advertisement
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, शारदीय नवरात्रौत्सवामध्ये घटस्थापनेसाठी सर्वांत शुभ मुहूर्त 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:40 ते दुपारी 12:45 पर्यंत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीची पूजा करावी. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची पूजा केल्याने देवीचा आशीर्वाद कायम राहतो.
advertisement
दरम्यान, यंदा अधिक मास आल्याने नवरात्र उत्सव हा इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे थोडा उशिरा येत आहे. परंतु यंदा देवीचं आगमन हत्तीवरून होत असल्याने या उत्सवाची सुरुवातच अत्यंत शुभ होत आहे. नवरात्रकाळात अनेक भाविक नऊ दिवस उपवाससुद्धा करतात. तसंच नवरात्रीचं व्रत करणंही धार्मिक मान्यतेनुसार शुभ मानलं जातं. महाराष्ट्रामध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मंदिरांमध्ये तयारीही सुरू करण्यात आली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2023 12:03 PM IST