Asian Games : भारताच्या महिला क्रिकेट संघाला सुवर्ण, श्रीलंकेला हरवून घडवला इतिहास
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
एशियन गेम्समध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवत सुवर्णपदक पटकावलं. फायनलमध्ये भारताने श्रीलंकेवर १९ धावांनी विजय मिळवला.
हांगझोऊ, 25 सप्टेंबर : एशियन गेम्समध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवत सुवर्णपदक पटकावलं. फायनलमध्ये भारताने श्रीलंकेवर १९ धावांनी विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद ११६ धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला २० षटकात ८ बाद ९७ धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारताच्या स्मृती मानधनाने ४५ चेंडूत ४६ धावा तर जेमिमा रॉड्रिग्जने ४० चेंडूत ४२ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही बॅटरला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. तर भारताच्या गोलंदाजीत तितास साधूने ३ विकेट घेतल्या तर राजेश्वरी गायकवाडने दोन विकेट घेतल्या. याशिवाय दिप्ती शर्मा, पुजा वस्त्रकार, देविका वैद्य यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
advertisement
श्रीलंकेकडून हसीनी परेरा आणि निलाक्षी डी सिल्वा यांना २० पेक्षा जास्त धावा करता आल्या. तर ओशाडी रणसिंघेने १९ आणि चमारी अटापट्टूने १२ धावा केल्या. या चौघींशिवाय इतर कोणाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
एशियन गेम्सच्या इतिहासात तिसऱ्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. याआधी दोन वेळा क्रिकेटच्या स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. मात्र तेव्हा दोन्ही वेळा भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी सहभाग घेतला नव्हता. पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये उतरलेल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2023 2:54 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asian Games : भारताच्या महिला क्रिकेट संघाला सुवर्ण, श्रीलंकेला हरवून घडवला इतिहास