IPLचे पिच क्युरेटर्स आणि ग्राउंड्समनही मालामाल, BCCIने केली मोठी घोषणा
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल 2024 स्पर्धेतील पिच क्युरेटर्स आणि ग्राउंड्समनसाठी बक्षीस जाहीर केलं आहे.
चेन्नई : नुकतीच इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल 2024) ही टी-20 क्रिकेट स्पर्धा पार पडली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने या सीझनचं विजेतेपद पटकावलं. कोलकाता नाइट रायडर्सने फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने पराभव केला आणि एकूण तिसरी आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली. कोणतीही क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पिच क्युरेटर्स आणि ग्राऊंड्समन महत्त्वाची भूमिका बजावतात. बदलतं हवामान, पाऊस आणि इतर अडचणी असूनही हे लोक मॅच यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नांची जाणीव ठेवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल 2024 स्पर्धेतील पिच क्युरेटर्स आणि ग्राउंड्समनसाठी बक्षीस जाहीर केलं आहे. आज (27 मे) रोजी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी बक्षीस रक्कम जाहीर केली. शहा यांनी पीच क्युरेटर्स आणि ग्राऊंड्समनला 'अनसंग हिरो' म्हटलं आहे.
बीसीसीआई सचिव जय शहा यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट केली. "आमचा टी-20 सीझन यशस्वी करण्यात अनसंग हिरो असलेल्या ग्राउंड स्टाफचा मोठा वाटा आहे. त्यांनी प्रतिकूल हवामानात उत्कृष्ट खेळपट्ट्या तयार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या कष्टांचं कौतुक करण्यासाठी 10 नियमित आयपीएल व्हेन्यूंवरील ग्राऊंड्समन आणि क्युरेटर्सना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्यात येतील. तीन अतिरिक्त व्हेन्यूंवरील ग्राऊंड्समन आणि क्युरेटर्सना प्रत्येकी 10 लाख रुपये दिले जातील. त्यांच्या समर्पण आणि मेहनतीबद्दल आभारी आहोत," अशी पोस्ट शहा यांनी केली आहे.
advertisement
आयपीएलच्या या सीझनमध्ये अनेक विक्रम मोडीत निघाले तर अनेक नवीन विक्रम प्रस्थापित झाले. सनरायझर्स हैदराबादने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक 287 रन्स केले. या पूर्वी, आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही टीमला फक्त दोनदा 250 रन्सचा टप्पा ओलांडता आला होता. आयपीएल 2024 मध्ये विविध टीम्सनी एकूण आठ वेळा अशी कामगिरी केली. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक तीन वेळा 250 रन्सचा टप्पा ओलांडला तर कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा ही कामगिरी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सने प्रत्येकी एकदा अशी कामगिरी केली आहे. बॅटिंगला अनुकूल असलेल्या पीचेसमुळे हे शक्य झालं. त्यामुळे पीच क्युरेटर्स आणि ग्राउंड्समनचं कौतुक करण्यात आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 27, 2024 2:22 PM IST