Rishabh Pant IPL 2025: 27 कोटींचे वाटोळे, 27 धावा करता येईना; पंत मैदानावर उतरला की ठरतोय संघासाठी ओझं
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Rishabh Pant: आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. आयपीएलच्या या हंगामातील पहिल्या 3 सामन्यात पंतला 27 धावा देखील करता आल्या नाहीत.
लखनऊ : 'नाव मोठे लक्षण खोटे' ही म्हण सध्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या कोणत्या खेळाडूला तंतोतंत लागू पडते असेल तर तो म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत होय. आयपीएल 2025मध्ये पंत मैदानावर उतरला की तो संघासाठी ओझं ठरतोय. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, 27 कोटींची मोठी रक्कम घेणारा पंत 27 धावांंसाठी झगडतोय.
लखनऊ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला मोठ्या अपेक्षांनी लिलावात 27 कोटींमध्ये खरेदी करून कर्णधार बनवले. पण पहिल्या तीन सामन्यांमध्ये संघ व्यवस्थापनाला निराशाच पदरी पडली. पंतने पहिल्या सामन्यात 0, दुसऱ्यात 15 आणि तिसऱ्यात केवळ 5 धावांचे योगदान दिले. एवढेच नाही तर कर्णधार म्हणूनही तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही आणि त्यामुळेच आता प्रत्येकजण त्याला मिळणाऱ्या मोठ्या रकमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
advertisement
पंत स्वतःच परततोय पॅव्हेलियनमध्ये
एक फलंदाज तो असतो जो गोलंदाजाच्या कौशल्याने बाद होतो आणि काही फलंदाज असे असतात जे स्वतःहून आपली विकेट फेकून देतात. तर तिसऱ्या प्रकारचे फलंदाज असे असतात जे वारंवार एकसारखी चूक करतात आणि कोणत्याही पश्चातापाशिवाय पॅव्हेलियनमध्ये परततात. पंत काहीसा याच प्रकारात येतो.
एकाच पद्धतीने बाद होतोय
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ऋषभने 5 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर सहाव्या षटकातील कुलदीपच्या चेंडूवर उभा राहून हवेत फटका मारला आणि बाद झाला. सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात पंतने 14 चेंडू खेळल्यानंतर 15 व्या षटकातील हर्षल पटेलच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा हवेत झेलबाद झाला आणि पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात 4 चेंडूत 2 धावा काढल्यानंतर पाचव्या षटकातील मॅक्सवेलच्या चेंडूवर पुन्हा स्वीप शॉट खेळून शॉर्ट फाइन लेगवर झेलबाद झाला. पंत इतक्या वाईट फॉर्ममधून जात आहे की, त्याने तीन डावांमध्ये 26 चेंडूत केवळ 20 धावा केल्या आहेत.
advertisement
यष्टीरक्षण आणि कर्णधारपदामध्येही अपयशी!
फलंदाजीत वाईट दिवस असू शकतो पण कर्णधारपद आणि यष्टीरक्षणामध्येही ऋषभ पंतची अवस्था बिकट आहे. पहिल्या सामन्यात शार्दुल ठाकूरला गोलंदाजी न देणे, शेवटच्या षटकात स्टंपिंग सोडणे आणि महत्त्वाच्या क्षणी गडबडणे, अशा चुका पंतने केल्या आहेत.
IPLमध्ये पंजाबविरुद्ध तर पंतची कामगिरी कधीच चांगली झाली नाही. ऋषभ पंतने पंजाब किंग्जविरुद्धच्या 14 सामन्यांच्या 13 डावांमध्ये 16.50 च्या सरासरीने आणि 121.47 च्या स्ट्राईक रेटने 198 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 39 धावा राहिली आहे. आतापर्यंत पंतला पंजाब किंग्जविरुद्ध एकही अर्धशतक झळकावता आले नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 01, 2025 9:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rishabh Pant IPL 2025: 27 कोटींचे वाटोळे, 27 धावा करता येईना; पंत मैदानावर उतरला की ठरतोय संघासाठी ओझं