MPSC Success Story: लग्न झालं अन् 6 महिन्यात सुरू केली MPSC ची तयारी, पत्नीची साथ, अपयशावर मात! नयन राज्यात 15 वा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नयन विठ्ठल वाघने पूनमच्या साथीत अपयशावर मात करत MPSC परीक्षेत राज्याच्या आदिवासी विभागातून १५ वा क्रमांक मिळवला, त्याचा संघर्ष युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरला.
जिद्द, कष्ट आणि महत्त्वाकांक्षेला जर जोडीदाराची खंबीर साथ मिळाली, तर कोणतेही लक्ष्य गाठणे अशक्य नाही, हे कर्जत येथील नयन विठ्ठल वाघ या आदिवासी तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. दहावीच्या परीक्षेत तब्बल तीन वेळा अपयश पत्करलेल्या नयनने, लग्नानंतर सहा महिन्यांतच MPSC च्या तयारीला लागून राज्याच्या आदिवासी विभागातून १५ वा क्रमांक पटकावला आहे. पत्नी पूनमने शिलाई काम करून त्याला दिलेला हातभार आणि कुटुंबाचा त्याग यामुळे नयनचा हा प्रवास युवा पिढीसाठी एक मोठा प्रेरणास्रोत ठरला आहे.
दहावीत तीन वेळा अपयश आणि वडिलांनी सोडली आशा
ऐनाची वाडी या १५० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या आदिवासी वस्तीत नयनचे वाघ कुटुंब राहते. कुटुंबात कोणीही शिकलेले नसताना, नयनचे वडील विठ्ठल वाघ यांनी मुलाने शिकावे म्हणून प्रचंड मेहनत घेतली. मात्र, नयनचे शिक्षणात विशेष लक्ष नव्हते. तो कसाबसा दहावीपर्यंत पोहोचला, पण त्याला सलग तीन प्रयत्नांमध्ये यश आले नाही. मुलाचे शिक्षणाकडे दुर्लक्ष आणि वारंवार अपयश पाहून वडिलांनीही तो शिकेल ही आशा सोडून दिली आणि नयन मजुरीसाठी जाऊ लागला. पण आयुष्यात आलेल्या एका शिक्षकाने त्याला पुन्हा एकदा शिकण्यासाठी प्रेरित केले आणि तिथूनच नयनच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने वळण मिळाले.
advertisement
शिक्षक आणि पदवीपर्यंतचा प्रवास
नयन ज्या ठिकाणी मजुरीचे काम करत होता, तिथे पुंडलिक कंटे नावाचे शिक्षक होते. त्यांनी नयनला शिक्षण सोडण्याबद्दल विचारले आणि त्याला पुन्हा अभ्यास सुरू करण्यासाठी आग्रह धरला. शिक्षकांच्या शब्दांवर विश्वास ठेवून नयनने पुन्हा दहावीची तयारी केली आणि यावेळी त्याने सहज यश मिळवले. यानंतर त्याने बारावीच्या महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयातून त्याने भूगोल विषयात पदवी संपादन केली. शिक्षणात यश मिळाल्यावर नयनने सलग तीन वर्षे पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले, मात्र थोडक्यासाठी त्याला संधी हुकली. एवढ्या अपयशानंतरही नयनने आपली जिद्द सोडली नाही.
advertisement
लग्नानंतर MPSC ची तयारी आणि पत्नीची साथ
२०१९ मध्ये नयनने राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी सुरू केली. याच काळात तो शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मजुरीचे कामही करत राहिला. दरम्यान, कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्याने घरच्यांनी त्याचे लग्न पूनम हिच्याशी लावून दिले. नयन विवाहित झाला, पण त्याने आपले स्वप्न सोडले नाही. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच त्याने कठोर निर्णय घेत पूनमला तिच्या माहेरी पाठवले, जेणेकरून आपल्या संघर्षात तिची परवड होऊ नये. नयनचे वडील अर्धांगवायूमुळे आजारी पडल्याने घराची जबाबदारीही त्याच्यावरच आली होती.
advertisement
अपंगत्वावर मात करत अभ्यास आणि पत्नीचा त्याग
view comments२०२२ मध्ये नयनने पालघर येथील जिजाऊ शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून MPSC चे शिक्षण सुरू केले. याच दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीत त्याच्या पायाला दुखापत झाली आणि ती संधीही हुकली. मात्र त्याने हार मानली नाही. त्याने वॉकरच्या मदतीने अभ्यास सुरू ठेवला आणि २०२४ मध्ये काठी घेऊनच लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा दिली. त्याची पत्नी पूनम पदवीधर असल्याने तिने पतीच्या संघर्षात खंबीर साथ दिली. शिवणकाम (सिलाई) करून मिळणाऱ्या पैशातून तिने नयनला आर्थिक हातभार लावला. पती-पत्नीच्या या त्याग आणि संघर्षातूनच नयनने MPSC परीक्षेत राज्यात १५ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले.
Location :
Maharashtra
First Published :
November 07, 2025 2:37 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
MPSC Success Story: लग्न झालं अन् 6 महिन्यात सुरू केली MPSC ची तयारी, पत्नीची साथ, अपयशावर मात! नयन राज्यात 15 वा


