Exter VS Punch: फीचर, इंजिन आणि मायलेज दोन्ही सारखंच मग कोणती गाडी बेस्ट?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गणेशोत्सवात गाडी खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्यासाठी टाटा पंच की ह्युंदाई एक्सटर ठरेल योग्य
मुंबई, 22 सप्टेंबर : वाहन बाजारात आजकाल दोन कॉम्पॅक्ट एसयूव्ही गाड्यांमध्ये प्रचंड स्पर्धा दिसत आहे. त्यातही दोन अशा कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहेत, ज्यांच्यामध्ये सर्वात जास्त स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही गाड्या मायक्रो एसयूव्ही सेगमेंटची पूर्तता करीत असून त्या अनेक फीचर्ससह ग्राहकांना आकर्षित करतात. या दोन गाड्या म्हणजे ह्युंदाई कंपनीची एक्सटर आणि टाटा कंपनीची पंच. टाटा पंचनं टॉप 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय. तर, एक्सटर गाडीचं ज्या वेगानं बुकिंग होत आहे, ते पाहता ही गाडीही लवकरच टॉप कारच्या यादीत समाविष्ट होईल असं दिसतंय. आता डिझाईन आणि कॉस्मेटिक बदलांव्यतिरिक्त जर या दोन कारमधील फरकाबद्दल विचार केल्यास, तर दोन्हीमधील फरक सांगणं कठीण आहे. या दोन्ही गाड्या डोळ्यांनी पाहून त्यामधील फरक सांगणं तर खूपच कठीण आहे.
अशा परिस्थितीत तुम्ही जर गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर या दोन्ही गाड्यांपैकी कोणती गाडी खरेदी करायची, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. भारतीय कंपनीची पंच गाडी खरेदी करायची की कोरियन कंपनीच्या एक्स्टरवर विश्वास ठेवायचा? या दोन्ही कारमधील नेमका फरक काय? कोणती गाडी तुमच्यासाठी चांगली असेल? असे अनेक प्रश्न तुमच्यासमोर असतील. चला तर, आज आपण या दोन्ही गाड्यांबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊ.
advertisement
डायमेन्शन्समधील फरक
ह्युंदाईच्या एक्सटर गाडीची लांबी 3815 मिमी आहे, तर पंच गाडीची लांबी 3827 मिमी आहे. रुंदीच्या बाबतीत, एक्सटरची रुंदी 1710 मिमी आणि पंचची रुंदी 1742 मिमी आहे. एक्सटरची बूट स्पेस 391 लिटर आहे, तर पंचची 366 लिटर आहे. या शिवाय, पंचचा ग्राउंड क्लिअरन्स 187 मिमी आणि एक्सटरचा 185 मिमी आहे.
advertisement
कोणत्या गाडीची किंमत किती?
एक्सटर गाडीच्या बेस व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 9.3 लाख रुपये आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज असलेल्या एक्सटरची एक्स शोरुम किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू होते. तर या सेगमेंटमधील टॉप व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 10 लाख रुपये आहे. सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 8.2 लाख रुपये आहे. तर, पंच गाडीच्या बेस व्हेरियंटची किंमत एक्सटर गाडीपेक्षा 1,000 रुपयांनी जास्त आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे. तर, टॉप व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 9.5 लाख रुपये व ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 7.5 लाख रुपये आहे.
advertisement
इंजिनमध्ये फारसा फरक नाही
एक्सटर आणि पंचच्या इंजिनमध्ये तुम्हाला फारसा फरक दिसणार नाही. दोन्ही गाड्या 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह येतात. एक्सटरचं इंजिन 4 सिलिंडरचं असून पंच गाडीचं इंजिन 3 सिलिंडरचं आहे. पंचचे पॉवर आउटपुट जास्त असून ते 86 बीएचपी पॉवर जनरेट करते. तर, एक्सटर गाडीचे इंजिन 83 बीएचपी पॉवर जनरेट करते.
advertisement
मायलेज कोणत्या गाडीचं जास्त?
एक्सटरमध्ये 4 सिलेंडर इंजिन असूनही त्याचे मायलेज पंचपेक्षा किंचित जास्त आहे. एक्सटर एका लिटर पेट्रोलमध्ये 19.5 मायलेज देते. तर पंचचे मायलेज 18.9 असल्याचा दावा केला जातोय. अर्थात प्रत्यक्ष रस्त्यावर या दोन्ही कारचे मायलेज पहिल्या सर्व्हिसिंगनंतर 20 टक्क्यांपेक्षा जास्त होईल, असा दावा करण्यात येतोय. या दोन्ही गाड्यांच्या सीएनजी व्हेरियंटचा विचार केल्यास एक्सटर गाडी 28 ते 30 किमी प्रति किलो आणि पंच गाडी 30 ते 31 किमी प्रति किलो मायलेज देते.
advertisement
गाडीमध्ये काय आहेत फीचर्स?
पंच गाडी ही एक्सटरच्या गाडीच्या अगोदर मार्केटमध्ये आली आहे. त्यामुळे या गाडीत एक्सटर गाडीच्या तुलनेत काही फीचर्स कमी आहेत. मात्र, या गाडीच्या फीचर्समध्येही लवकरच अपडेट केलं जाऊ शकतं. पंचमध्ये तुम्हाला 7-इंच टचस्क्रीन, अँड्राईड ऑटो आणि अॅपल कार प्ले कनेक्टिव्हिटी, रिअर-व्ह्यु कॅमेरा, पार्ट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फॉलो-मी-होम हेडलॅम्प, क्रूझ कंट्रोल, ड्युअल एअरबॅग्ज अशी फीचर्स आहेत. तर एक्सटर गाडी याबाबतीत एक पाऊल पुढे आहे. या गाडीत 8-इंच टचस्क्रीन, बॅक कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 6 एअरबॅग्ज आणि व्हॉईस कमांड एक्टिव्हेशनसह सनरूफ, डॅशकॅम, वायरलेस चार्जिंग आणि एएमटी पॅडल शिफ्टर्स यांसारखी नवीन फीचर्स आहेत.
advertisement
जाणून घ्या कोणती गाडी खरेदी करणे ठरेल फायद्याचं
पंच व एक्सटर या दोन्ही गाड्या उत्कृष्ट आहेत. या दोन्ही गाड्यांपैकी कोणती गाडी चांगली आहे, हे सांगणे चुकीचे ठरेल. पंच आणि एक्स्टरमध्ये जर काही मोठा फरक असेल तर तो डिझाइनचा आहे. जर तुम्हाला राउंडेड एसयूव्ही आवडत असेल तर पंच तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. जर तुम्हाला बॉक्सी लूकमधील गाडी आवडत असेल, तर एक्सटर ही तुमच्यासाठी योग्य गाडी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2023 2:33 PM IST