इकडे आड तिकडे विहीर! मुरबाड शहरातील उड्डाणपूल स्थानिकांसाठी ठरतेय डोकेदुखी; नेमके कारण काय?
Last Updated:
Murbad Flyover Issue : मुरबाडमधील उड्डाणपूल अपुऱ्या नियोजनामुळे नागरिकांसाठी अडचणींचा ठरत आहे. पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूक कोंडी, वाढलेला इंधन खर्च आणि बाजारपेठेवर होणारा परिणाम यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ठाणे : मुरबाड शहराच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतर्गत उभारण्यात आलेला लांबलचक उड्डाणपूल शहरवासीयांसाठी दिलासादायक ठरण्याऐवजी अडचणींचा ठरत असल्याचे सध्या दिसत आहे. सोनारपाडा वळणापासून सुरू होणारा हा पूल वेगवान वाहनांना थेट शहराबाहेर नेण्यासाठी फायदेशीर असला तरी त्याचे नियोजन अपुरे असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बायपास मार्गिका नाही, नागरिकांना मोठा फेरफटका
तीनहात नाका आणि म्हसा नाका या दोन ठिकाणांखेरीज उड्डाणपुलाला अन्य कोणतीही पर्यायी बायपास मार्गिका देण्यात आलेली नाही. त्यामुळे उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागांमध्ये हातगाड्या, टपऱ्या, पार्किंग केलेली वाहने आणि खासगी प्रवासी गाड्यांची गर्दी वाढली आहे. यामुळे वाहतूक कोंडी वाढून उड्डाणपुलाचा अपेक्षित फायदा शहरवासीयांना मिळत नसल्याचे दिसून येते.
advertisement
उड्डाणपुलाच्या नियोजन टप्प्यात काही ठिकाणी बायपास मार्गिका तयार करणे आवश्यक होते. मात्र आता त्या शक्य नसल्याने भविष्यात पुन्हा मोठा खर्च आणि जास्त वाट पाहावी लागणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन वाहनांना मार्ग कसा मिळणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
या उड्डाणपुलामुळे वाहने थेट शहराबाहेर जात असल्याने नाक्यावरील आणि शहरातील छोट्या व्यावसायिकांना ग्राहक कमी होण्याची भीती आहे. याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
नागरिकांचा दैनंदिन मार्गच गुंतागुंतीचा झाला
सोनारपाडा, मातानगर, गणेशनगर, देवीची आळी, देवगाव रोड आणि विद्यानगर परिसरातील रहिवाशांना घराकडे जाण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागत आहे. वाढलेली वाहतूक, इंधन खर्च आणि पायपीट यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 10:20 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
इकडे आड तिकडे विहीर! मुरबाड शहरातील उड्डाणपूल स्थानिकांसाठी ठरतेय डोकेदुखी; नेमके कारण काय?









