मालद्वीव राष्ट्रपतींच्या हट्टामुळे मुलाने गमावला जीव! चिमुकल्याच्या एअरलिफ्टसाठी भारतीय विमानाला परवानगी नाकारली
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
भारत आणि मालद्वीवमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. यातच आता मालद्वीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे.
माले : भारत आणि मालद्वीवमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. यातच आता मालद्वीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. मालद्वीव मीडिया रिपोर्टनुसार शनिवारी मालद्वीवमध्ये एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या अल्पवयीन मुलाला ब्रेन ट्यूमर होता. त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यामुळे त्याला उपचारासाठी राजधानी मालेच्या रुग्णालयात हलवणं गरजेचं होतं, मात्र राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी एअरलिफ्टसाठी भारतानं प्रदान केलेलं डॉर्नियर विमान वापरण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यानं या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित 14 वर्षांचा मुलगा हा आपल्या कुटुंबासोबत मालद्वीच्या अफिफ विलिंगिली भागात राहात होता. त्याला ब्रेन ट्यूमरचा आजार होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याला उपचारासाठी मालेमधील रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. त्याच्या कुटुंबानं एअरलिफ्टची मदत मागितली. मात्र मोहम्मद मुइज्जू यांनी एअरफिफ्टसाठी भारतानं दिलेल्या डॉर्नियर विमान वापरण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यानं या मुलाचा कथीत स्वरुपात मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
advertisement
याबाबत मालद्वीवमधील मीडियानं मृत्यू झालेल्या मुलाच्या वडिलांच्या हवाल्यानं माहिती दिली आहे. ' आम्ही मुलाला ट्रोक आल्यानंतर तातडीनं एअर अॅम्ब्युलन्ससाठी आयलँड एव्हिएशनशी संपर्क साधला. मात्र त्यांनी आमच्या कॉलला उत्तर दिलं नाही. त्यानंतर दुसऱ्यादिवशी गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी आमच्या फोनला प्रतिसाद दिला. त्यानंतर मुलाला माले येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला उशिर झाल्यानं त्याचा मृत्यू झाला.' मात्र दुसरीकडे 'आम्हाला कॉल प्राप्त होताच आम्ही उड्डाणाची तयारी केली होती. मात्र दुर्दैवानं उड्डाणात काही तांत्रिक समस्या आल्यामुळे आम्हाला शेवटच्या क्षणी उड्डान रद्द करावं लागलं' असं निवेदन या कंपनीच्या वतीनं देण्यात आलं आहे. दरम्यान याच प्रकरणावरून तेथील एका खासदारानं देखील राष्ट्रपती मुइज्जू यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
January 21, 2024 11:01 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
मालद्वीव राष्ट्रपतींच्या हट्टामुळे मुलाने गमावला जीव! चिमुकल्याच्या एअरलिफ्टसाठी भारतीय विमानाला परवानगी नाकारली


