पाकिस्तानात 48 तासांत 57 हल्ले, 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Terrorist Attacks in Pakistan: गेल्या 48 तासांत पाकिस्तानमध्ये तब्बल 57 हल्ले झाले आहेत. यामध्ये बलुचिस्तानमधील रेल्वे हायजॅक घटनेचा समावेश नाही. यातील बहुतेक हल्ले टीटीपी आणि बीएलएने केल्याची माहिती आहे.
दिल्ली: मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. येथील परिस्थिती सुधारायचं नाव घेत नाहीये. बंडखोरांनी केलेल्या एकामागून एक हल्ल्यांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. माहितीनुसार, गेल्या 48 तासांत पाकिस्तानमध्ये तब्बल 57 हल्ले झाले आहेत. यामध्ये बलुचिस्तानमधील रेल्वे हायजॅक घटनेचा समावेश नाही. यातील बहुतेक हल्ले टीटीपी आणि बीएलएने केल्याची माहिती आहे.
स्नायपर शॉट्स, ग्रेनेड हल्ले आणि आयईडी स्फोटांद्वारे बंडखोरांनी पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, या हल्ल्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर 46 जण जखमी झाले आहेत. तर, बीएलएच्या दाव्यानुसार, ही संख्या तब्बल 100 पेक्षा अधिक आहे.
रविवारी पाकिस्तानातील क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सात सैनिक ठार झाले आणि 21 जण जखमी झाले. पण बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने 90 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावरील हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने घेतली आहे. हा हल्ला क्वेट्टापासून 150 किमी अंतरावर असलेल्या नोशकी येथे झाला. या हल्ल्यानंतर लष्कराने परिसरात हेलिकॉप्टर आणि ड्रोन तैनात केले.
advertisement
लष्कराच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर आता दहशतवादी हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. हा हल्ला अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर असलेल्या गरिगल सीमा चौकीवर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात फ्रंटियर कॉर्प्स बाजौर स्काउट्सचे ९ सैनिक जखमी झाले. अशाच प्रकारे मागच्या 48 तासांत पाकिस्तानमध्ये एकूण 57 छोटे मोठे हल्ले झाले आहेत.
खरं तर, याआधी बीएलएने 14 मार्च रोजी एक ट्रेन हायजॅक केली होती. यानंतर पाकिस्तानी सैन्य आणि बलुच बंडखोरांमध्ये अनेक तास गोळीबार आणि चकमक बघायला मिळाली होती. या हल्ल्याबाबत पाकिस्तान आणि बलुच बंडखोरांचे वेगवेगळे दावे आहेत. या हल्ल्यात 18 सैनिकांसह 31 जण ठार झाल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले होते. पाकिस्तानमध्ये एकामागून एक होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे देशाच्या आर्थिक अर्थव्यवस्थेला देखील याचा मोठा फटका बसला आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
March 17, 2025 7:00 AM IST


