mossad: दहशतवाद्यांनी विमान केलं हायजॅक, 2 तासांमध्ये केली सुटका, मोसादचं 'ऑपरेशन थंडरबोल्ट' कसं होतं?

Last Updated:

हे ऑपरेशन एक तास चालेल असं ठरवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात त्यापेक्षा दोन मिनिटं कमी वेळातच ते यशस्वी झालं.

(mossad operation thunderbolt)
(mossad operation thunderbolt)
अवघ्या जगाला धडकी भरवणाऱ्या आणि जगातल्या इतर गुप्तहेर संघटनांनीही जिचं मोठेपण मान्य केली आहे ती इस्रायलची गुप्तहेर संस्था म्हणजे मोसाद. मोसादने हमासच्या इस्माइल हानियाची त्याच्या घरात घुसून हत्या केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मोसादच्या अनेक ऑपरेशन्सची चर्चा होत आहे. 1976मध्ये मोसादने ‘ऑपरेशन थंडरबोल्ट’ हाती घेतलं होतं. ऑपरेशन थंडरबोल्टमध्ये मोसादने हायजॅक करण्यात आलेल्या एका फ्रेंच विमानातून इस्रायली नागरिकांची सुटका केली होती.
गेल्या वर्षी सात ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याचा बदला आज इस्माइल हानियाची हत्या करून इस्रायलच्या मोसादने घेतला आहे. इराणमध्ये हानियाची हत्या करण्यात आली आहे. इराणच्या इराण रेव्होल्युशनरी गार्ड्स या सैन्यदलाने हानियाची हत्या झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हमासकडूनही इस्माइल हानियाची हत्या झाल्याचं सांगण्यात आलं आहे आणि या हत्येचं खापर इस्रायलवर फोडण्यात आलं आहे.
advertisement
इस्रायलकडून इराणमध्ये अनेक गुप्त ऑपरेशन्स राबवण्यात आली आहेत. त्यांचा इतिहास मोठा आहे. ही ऑपरेशन्स मोसादकडून राबवण्यात आली आहेत हे स्पष्टच आहे. सात ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यानंतर मोसादच्या प्रमुखांनी इस्माइल हानियाची हत्या करण्याचा विडा उचलला होता. आज त्याच्या हत्येनंतर जगभर मोसादच्या कारनाम्यांची चर्चा आहे. मोसादच्या अनेक ऑपरेशन्सपैकी ‘ऑपरेशन थंडरबोल्ट’ हे बहुचर्चित आहे. यात इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा भाऊ योनातन याचा मृत्यू झाला होता.
advertisement
27 जून 1976 ला एअर फ्रान्सचं विमान तेल अवीवहून पॅरिसला निघालं. ते अथेन्समध्ये थांबलं. त्या वेळी जर्मन बाडर मेनहोफ दहशतवादी गटाशी संबंधित विल्फ्रेड बोस आणि ब्रिगिट कुहमन हे पॉपुलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइनचे दोन दहशतवादी या विमानात चढले आणि त्यांनी विमान हायजॅक केलं. पुढे लिबियामध्ये त्यांनी विमान उतरवून इंधन भरलं. ब्रिटिश प्रवासी पॅट्रिशिया मार्टेल हिने आपला गर्भपात झाल्याचं नाटक केल्यामुळे त्यांनी तिला सोडून दिलं. मार्टेल हिने या घटनेची माहिती मोसादला कळवली. तिने फोटो पाहून दहशतवाद्यांची ओळखही पटवली. तिकडे विमान लिबियाहून युगांडाकडे निघालं. 28 जूनला दुपारी सव्वातीनला ते एंटेबे विमानतळावर पोहोचलं. विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी युगांडाच्या राष्ट्रपतींनी सैन्यदल तैनात केलं. विमान उतरताच दहशतवाद्यांनी ज्यू आणि इस्रायली प्रवाशांना इतरांपासून वेगळं केलं.
advertisement
इस्रायली नागरिकांची सुटका करण्यासाठी मोसादने ‘ऑपरेशन थंडरबोल्ट’ हाती घेतलं. तीन जुलैला त्याची सुरुवात झाली. विमान सोडण्यासाठी दहशतवादी 35 कोटी रुपयांची मागणी करत होते. त्यांच्या इतरही मागण्या होत्या. त्यासाठी इस्रायलला त्यांनी दोन दिवसांची मुदत दिली. मागण्या पूर्ण न झाल्यास सगळ्यांची हत्या केली जाईल असंही दहशतवाद्यांनी स्पष्ट केलं. इस्रायलकडे एंटेबे विमानतळावरील त्यांच्या लोकेशनबाबत नेमकी माहिती कमी होती. दरम्यान मुदतवाढ मिळवून इस्रायलने चर्चेचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान दहशतवाद्यांनी 100 जणांना मुक्त केलं. त्यांना पॅरिसला आणण्यात आलं. या काळात एअर फ्रान्सचा क्रू त्या 105 ज्यू इस्रायली प्रवाशांबरोबरच थांबला हे विशेष.
advertisement
या सगळ्यात अमेरिकेसह अनेक देशांकडे मदतीचा हात मागण्यात आला. दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान यित्झाक राबिन आणि संरक्षण मंत्री शिमोन पेरेझ यांच्यात वाद झाले. अपहरणकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत राबिन इच्छुक होते; मात्र तसं केल्यास दहशतवादाला चालना मिळेल अशी भिती पेरेझ यांना होती. कर्नल योनातन नेतान्याहू यांच्याबरोबर झालेली बैठक हे पेरेझ यांच्या भितीचं मुख्य कारण होतं. नेतान्याहू हे ऑपरेशन यशस्वी होणार याबाबत ठाम होते. ब्रिगेडियर जनरल डॅन शोम्रोन यांनी एक जुलैला एक प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. 200हून अधिक सैनिकांसह एक मिशन हाती घेण्याची परवानगी त्यांनी मागितली.
advertisement
तीन जुलैला दुपारी सव्वातीन वाजता ऑपरेशन थंडरबोल्ट सुरू झालं. सैन्याच्या विमानाने मदतीसाठी इतर तीन विमानं घेऊन एंटेबेच्या दिशेने उड्डाण केलं. लेफ्टनंट कर्नल नेतान्याहू यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं. एंटेबे येथे पोहोचताच ले. कर्नल नेतान्याहू यांच्या टीमने सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांना गाफिल ठेवण्यासाठी आधी गोळीबारही न करण्याचे आदेश इस्रायली सैन्याला देण्यात आले. मात्र, ते टर्मिनलपर्यंत पोहोचत असतानाच युगांडाच्या सैनिकांनी वाहनांचा ताफा अडवण्याचे आदेश दिले. तेव्हा नेतान्याहू यांनी कमांडोला सायलेंट पिस्टलने सैनिकाला ठार मारण्याचे आदेश दिले. शत्रूला आपल्याबाबत माहिती मिळाली अशा भितीने त्यांनी टर्मिनलकडे धाव घेतली. अपहरण झालेल्या नागरिकांना विमानतळावरील मुख्य इमारतीत ठेवण्यात आलं होतं. टर्मिनलमध्ये जाताना कमांडोने आपण इस्रायली सैनिक असल्याची उद्घोषणा केली आणि पुढे अवघ्या सहा मिनिटांमध्ये सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पुढे युगांडाच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात ले. कर्नल नेतान्याहू यांचा मृत्यू झाला. या मोहिमेत युगांडाचे 45 सैनिक मरण पावले.
advertisement
11 वाजता एंटेबे विमानतळावर उतरलेली इस्रायलची विमानं 11.58 ला अपहृत नागरिकांची सुटका करून त्यांना घेऊन परतीच्या प्रवासाला निघाली. हे ऑपरेशन एक तास चालेल असं ठरवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात त्यापेक्षा दोन मिनिटं कमी वेळातच ते यशस्वी झालं.
मराठी बातम्या/विदेश/
mossad: दहशतवाद्यांनी विमान केलं हायजॅक, 2 तासांमध्ये केली सुटका, मोसादचं 'ऑपरेशन थंडरबोल्ट' कसं होतं?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement