Success Story : मेहनत आणि जिद्दीचं फळ, कोल्हापूरच्या शेतकऱ्याच्या मुलांची हार्वर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी निवड, प्रत्येकासाठी प्रेरणा देणारी कहाणी, Video
- Reported by:Niranjan Kamat
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात शिक्षणाची संधी मिळवणाऱ्या या जिद्दी मुलाने मोठ्या प्रतिष्ठित कंपनीचा सीईओ बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. माझं ध्येय मी नक्की साध्य करेन, असा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला.
कोल्हापूर: कागल तालुक्यात असणाऱ्या वाळवे खुर्द या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला विवेक हणमंत सुतार हा तरुण आज जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करू पाहत आहे. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात शिक्षणाची संधी मिळवणाऱ्या या जिद्दी मुलाने मोठ्या प्रतिष्ठित कंपनीचा सीईओ बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. माझं ध्येय मी नक्की साध्य करेन, असा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला. त्याची ही कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणा देणारी आहे.
हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवणे हे स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्याचे असते, पण ते साकार करणे सोपे नाही. दरवर्षी जगभरातून साडेतीन लाख अर्जांमधून केवळ 700 विद्यार्थ्यांची निवड होते. या तगड्या स्पर्धेत विवेकने आपले स्थान पक्के केले. आयबी (इंटरनॅशनल बॅकलॉरिएट) अभ्यासक्रमातील उत्कृष्ट गुण, सामाजिक सहभाग आणि उपक्रम यामुळे त्याला ही संधी मिळाली.
advertisement
शेतात राबणाऱ्या आई-वडिलांचा हा मुलगा आता जागतिक व्यासपीठावर झेप घेण्यास सज्ज आहे. विवेकचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लेखन. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी, दहावीत असताना, त्याने इकोज ऑफ इमोशन्स आणि हेलिंग पेजीस ही दोन पुस्तके लिहिली. विशेष म्हणजे हेलिंग पेजीस हे 700 पानांचे पुस्तक आहे, जे त्याच्या साहित्यिक प्रतिभेची आणि बौद्धिक क्षमतेची साक्ष आहे. शेतकऱ्याच्या मुलाने, शेतात काम करताना, अशी पुस्तके लिहिणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.
advertisement
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी मला नेहमी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात राहूनही मी माझा वेळ अभ्यास आणि स्वप्नांसाठी दिला. जागतिक पातळीवरील उद्योजक आणि संशोधक बनण्याचे माझे स्वप्न आहे, पण यासाठी मला आर्थिक मदतीची गरज आहे, असे विवेक सांगतो. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शैक्षणिक मदतीसाठी प्रस्ताव पाठवला आहे.
advertisement
यात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने मोलाची साथ दिली आहे. विवेकच्या या प्रवासात त्याच्या गावाने आणि कुटुंबाने त्याला खंबीर पाठबळ दिले. त्याचे स्वप्न फक्त त्याचे नाही, तर संपूर्ण गावाचे आहे. आर्थिक अडचणींमुळे त्याचे स्वप्न अडू नये, यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. विवेक सुतारची ही यशोगाथा ग्रामीण भारतातील प्रत्येक तरुणासाठी एक आदर्श आहे. शेतात राबणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी सज्ज आहे, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.
advertisement
विवेक सुतारची ही कहाणी ग्रामीण भागातील प्रत्येक मुलाला स्वप्ने पाहण्याची आणि ती साकार करण्याची प्रेरणा देते. त्याच्या यशस्वी वाटचालीसाठी गावातून आणि परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आर्थिक आणि नैतिक पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा आहे. विवेकच्या या यशोगाथेने एक गोष्ट स्पष्ट होते, की मेहनत आणि जिद्द असेल, तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
May 26, 2025 7:41 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Success Story : मेहनत आणि जिद्दीचं फळ, कोल्हापूरच्या शेतकऱ्याच्या मुलांची हार्वर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी निवड, प्रत्येकासाठी प्रेरणा देणारी कहाणी, Video








