मुलांच्या पुस्तकावर होता QR कोड, पालकांनी स्कॅन केला, नंतरचं दृश्य पाहून डोळ्यासमोर अंधारी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मुलांच्या जगात पुस्तके जादूसारखी असतात, पण एका घटनेने पालक आणि शिक्षकांना धक्का बसला आहे.
लंडन : मुलांच्या जगात पुस्तके जादूसारखी असतात, पण ब्रिटनमधील एका घटनेने पालक आणि शिक्षकांना धक्का बसला आहे. अँड्र्यू कोप यांनी लिहिलेली आणि 7 ते 12 वयोगटातील मुलांमध्ये खूप लोकप्रिय असलेली "स्पाय डॉग" ही मालिका अचानक चर्चेत आली आहे. या पुस्तकांच्या मागे किंवा आत आढळणाऱ्या वेबसाइट लिंक्स, मूळतः पात्रांबद्दल अतिरिक्त माहिती देण्यासाठी होत्या, आता त्या पोर्नोग्राफिक सामग्रीकडे वळत आहेत. हे लक्षात येताच प्रकाशक पफिन (पेंग्विन रँडम हाऊसचा एक छाप) यांनी त्वरित कारवाई केली आणि शाळा, ग्रंथालये आणि पुस्तकांच्या दुकानांना अलर्ट जारी केला. वॉटरस्टोन्स सारख्या चेन्सनी शेल्फमधून ही पुस्तके काढून टाकली, तर देशभरातील प्राथमिक शाळांमधील पालकांना आपत्कालीन पत्रे पाठवण्यात आली आहेत.
पुस्तकांची ही मालिका 2005 मध्ये 'स्पाय डॉग' या पहिल्या पुस्तकापासून सुरू झाली, ज्यामध्ये गुप्तचर संस्थेने प्रशिक्षित केलेला कुत्रा लारा एका कुटुंबासोबत गुप्तपणे काम करतो. त्यानंतर आणखी 11 पुस्तके आली, तसेच "स्पाय पप्स" (2009 पासून) आणि "स्पाय कॅट" (2015 पर्यंत) ही आलं. पुस्तकांमध्ये, लारा, स्पड आणि स्टार सारखी पात्रे मुलांना हेरगिरीच्या मजेदार जगाची ओळख करून द्यायची. पण काही आवृत्त्यांमध्ये छापलेल्या URL वरून सगळा गोंधळ सुरू झाला. या URL स्वतः लेखकाने 2016 साली सेट केली होती. या लिंकचा क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाता आणि यात तुम्हाला पुस्तकांमधल्या पात्रांची आणखी माहिती दिली जाते. पण हे डोमेन आता एका अज्ञात थर्ड पार्टीच्या नियंत्रणाखाली आलं आहे, जे त्याचा वापर पॉर्नोग्राफिक साईट म्हणून करत आहे.
advertisement
शाळेकडून तक्रार
पफिनला याबाबत अलीकडेच तक्रार मिळाली. वेस्ट ससेक्सच्या एका शाळेने पालकांना एक ईमेल पाठवून सावध केलं. पुस्तकांची लिंक वय पडताळणीशिवाय पोर्नोग्राफिक वेबसाइटवर जाते, असं शाळेने पालकांना सांगितलं. हॅम्पशायरच्या शालेय ग्रंथालय सेवेने कुटुंबांना त्यांच्या घरच्या प्रती तपासण्याचा सल्ला दिला.
'स्पाय डॉग्स/पप्स अँड स्पाय कॅट्स मालिकेतील पुस्तकांच्या मागील कव्हरवर एक वेबसाइट लिंक आहे जी पोर्नोग्राफिक सामग्री असलेल्या साइटवर जाते. शाळेच्या प्रती परत करा', असं पत्र लंडनच्या एका शाळेने पालकांना पाठवलं. यानंतर पफिनने ताबडतोब विक्री आणि वितरण थांबवले, तसंच भागिदारांनाही पुस्तके काढून टाकण्यास सांगितलं. यानंतर वॉटरस्टोन्सच्या पश्चिम लंडनमधील शाखेत सगळे शेल्फ रिकामे झाले.
advertisement
डोमेनवर थर्ड पार्टीचा ताबा
अँड्र्यू कोप आणि पफिन यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे, की, 'काही आवृत्त्या लेखक अँड्र्यू कोप यांच्या जुन्या वेबसाइटचा संदर्भ देतात, ज्याचे व्यवस्थापन त्यांनी केले होते. अलीकडेच, एका अज्ञात थर्ड पार्टीने डोमेनचा ताबा घेतला आहे आणि अनुचित प्रौढ सामग्री प्रदर्शित करत आहे. ही साइट पफिन किंवा कोपशी संबंधित नाही. आम्ही लोकांना साइटला भेट देऊ नये आणि मुलांनाही साईटवर जाण्यापासून रोखण्याचे आवाहन करतो. आम्ही हे गांभीर्याने घेत आहोत आणि साइट काढून टाकण्यासाठी कायदेशीर कारवाई करत आहोत. ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्याला वेळ लागेल. आम्ही पुस्तकांची विक्री आणि वितरण थांबवण्यात आले आहे'.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 8:39 PM IST
मराठी बातम्या/Viral/
मुलांच्या पुस्तकावर होता QR कोड, पालकांनी स्कॅन केला, नंतरचं दृश्य पाहून डोळ्यासमोर अंधारी!