कृषी हवामान : अवकाळीने टेन्शन वाढवलं! पुढील ४८ तासांसाठी या जिल्ह्यांना अलर्ट, कृषी सल्ला काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra weather update : मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही संपूर्णपणे माघार घेतलेला नाही. साधारणत: ऑक्टोबरमध्ये आकाश निरभ्र आणि वातावरण कोरडे असावे अशी अपेक्षा असताना, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अद्यापही ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी सुरू आहेत.
मुंबई : मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही संपूर्णपणे माघार घेतलेला नाही. साधारणत: ऑक्टोबरमध्ये आकाश निरभ्र आणि वातावरण कोरडे असावे अशी अपेक्षा असताना, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अद्यापही ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी केला असून, पुढील २४ ते ४८ तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
advertisement
मुंबईसह कोकण-मराठवाड्यात पुन्हा पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या मुंबई शाखेच्या माहितीनुसार, पुढील काही तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मुंबई शहरात दुपारी प्रचंड उष्मा जाणवेल, परंतु सायंकाळनंतर वातावरण ढगाळ होऊन काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
समुद्रातील कमी दाबाचा पट्टा बनला सक्रिय
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या ताज्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ आणि पश्चिम बंगालच्या उपसागर क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. सध्या त्याची तीव्रता कमी असली तरी पुढील २४ तासांमध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण किनारपट्टीवरील राज्यांसह महाराष्ट्रातही त्याचा सौम्य परिणाम दिसून येईल. कोकण, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर परिसरात या पावसाचा प्रभाव अधिक असू शकतो.
advertisement
दमट वातावरण आणि ऑक्टोबर हीटने नागरिक हैराण
सततचे ढगाळ वातावरण आणि उकाड्यामुळे दमट हवामानाचा तडाखा सर्वत्र जाणवतो आहे. शहरी भागात काँक्रिटच्या इमारतींमुळे उष्णता अडकून राहते, तर ग्रामीण आणि डोंगराळ भागांमध्ये सकाळचा गारवा थोडासा दिलासा देतो. हवामानाचा हा संमिश्र खेळ नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम करतोय.
advertisement
कृषी सल्ला काय?
पावसाच्या या अनिश्चित परिस्थितीत शेतकऱ्यांनी काढणीची प्रक्रिया सावधगिरीने करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. सोयाबीन आणि मका पिके पूर्णपणे सुकल्याशिवाय काढणी करू नये. काढलेले पीक लगेच खुल्या मैदानात न ठेवता शेडमध्ये वाळवावे. ओलसर हवेमुळे धान्याला बुरशी लागू शकते, म्हणून हवेचा प्रवाह असलेल्या जागी साठवणूक करावी. पावसाचा अंदाज असल्यास थ्रेशिंग व सुकवणी प्रक्रिया काही दिवस पुढे ढकलावी. जमिनीतील ओल वाढल्यास अति ओलसर शेतात यंत्राचा वापर टाळावा, अन्यथा माती चिकटून यंत्र बिघडू शकतात.
advertisement
पुढील ४८ तास महत्त्वाचे
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तळ कोकण, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाट क्षेत्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरींची हजेरी राहील. तसेच विदर्भातील काही भागांतही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे “ऑक्टोबर हीट” आणि “दमट वातावरण” यांच्या संगमात पुन्हा एकदा पावसाच्या सरी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सावध राहण्याची सूचना देत आहेत. आता या सरी नेमक्या कुठे आणि किती प्रमाणात बरसतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 23, 2025 8:26 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : अवकाळीने टेन्शन वाढवलं! पुढील ४८ तासांसाठी या जिल्ह्यांना अलर्ट, कृषी सल्ला काय?