शिक्षणासोबत तरुणाची शेती, केली गुलाब लागवड, वर्षाला 6 लाख रुपयांचा नफा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
गोविंद चव्हाण याचा हा प्रयोग इतर तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याने शिक्षण घेत असतानाच शेतीमध्ये नवे प्रयोग करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
बीड : सध्याच्या घडीला अनेक तरुण शिक्षण घेत शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहेत. बीड जिल्ह्यातील टालेवाडी गावचा रहिवासी असणारा गोविंद चव्हाण हा तरुण बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. मात्र, शिक्षण घेत असतानाच त्याने शेतीकडेही लक्ष केंद्रित केले आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्याने गुलाबाच्या व्यावसायिक उत्पादनाची सुरुवात केली. सुरुवातीला केवळ अर्ध्या एकरात गुलाब लागवड करणाऱ्या गोविंद याला त्यातून चांगला नफा मिळू लागला आहे. त्यामुळे त्याने या शेतीचा विस्तार करत एकूण एक एकर क्षेत्रात गुलाबाची शेती सुरू केली.
शेतीत आधुनिक दृष्टिकोन
गोविंद चव्हाण याने पारंपरिक शेतीसोबतच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत गुलाब उत्पादनाला अधिक महत्त्व दिले. सुरुवातीच्या टप्प्यात गुलाब लागवडीसाठी योग्य माती, खत व्यवस्थापन, सिंचन पद्धती आणि बाजारपेठेतील मागणी याचा सखोल अभ्यास केला. त्याने ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्याची बचत करत उच्च प्रतीचे गुलाब उत्पादन सुरू केले. त्यामुळे, त्याची शेती अधिक फायदेशीर ठरली.
advertisement
गुलाब उत्पादनातील वाढती मागणी
गेल्या दोन वर्षांपासून गोविंद चव्हाण सातत्याने गुलाब शेतीतून उत्पन्न घेत आहे. सध्या त्याच्याकडे एकूण दोन एकर शेती आहे. त्यापैकी एक एकर क्षेत्र गुलाब लागवडीसाठी वापरले जाते तर उर्वरित एक एकर पारंपरिक पिकांसाठी राखीव ठेवले आहे. गुलाब फुलांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्याला चांगला दर मिळतो. विशेषतः, हॉटेल, मंदिरे, विवाह समारंभ आणि पूजाविधींसाठी गुलाबाची मागणी वाढत आहे.
advertisement
वर्षाला 6 ते 7 लाख रुपयांचा नफा
गुलाब शेतीतून गोविंद चव्हाण याला वार्षिक 6 ते 7 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्याने बाजारपेठेतील मागणी लक्षात घेत विविध हंगामांमध्ये गुलाब उत्पादन वाढवले आहे. कमी खर्चात अधिक नफा मिळवण्यासाठी त्यांनी आधुनिक पद्धतींचा अवलंब केला आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा गुलाब शेती त्याच्यासाठी अधिक फायदेशीर ठरली आहे.
advertisement
तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
गोविंद चव्हाण याचा हा प्रयोग इतर तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याने शिक्षण घेत असतानाच शेतीमध्ये नवे प्रयोग करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कमी जागेत अधिक उत्पादन घेत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवल्यास शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते हे त्याने आपल्या यशस्वी प्रयोगातून सिद्ध केले आहे. अशा प्रकारच्या प्रयोगशील शेतीमुळे पारंपरिक शेतीकडे दुर्लक्ष न करता तरुणांना नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
March 17, 2025 3:55 PM IST