गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट! खरेदी दरात केली इतक्या रुपयांची वाढ
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Gokul Dudh Mahasangh : राज्यातील आघाडीची दूध सहकारी संस्था गोकुळ दूध संघाने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिवाळी भेट दिली आहे.
कोल्हापूर : राज्यातील आघाडीची दूध सहकारी संस्था गोकुळ दूध संघाने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिवाळी भेट दिली आहे. शुक्रवारी संस्थेने गाई आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर १ रुपयाने वाढ करण्याची घोषणा केली. तसेच दूध संस्थांना मिळणाऱ्या कमिशनमध्येही १० पैशांची वाढ करण्यात आली आहे.
ही घोषणा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (गोकुळ) च्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आली. संस्थेच्या नव्या चीज आणि गुलाबजाम उत्पादनांच्या लाँचिंग सोहळ्यात हा निर्णय जाहीर झाला. त्याचवेळी महालक्ष्मी डेअरी कारखान्यातून उत्पादित “गर्भवती पशुखाद्य” या नव्या उत्पादनाचेही लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, जयंत आसगावकर, माजी आमदार के. पी. पाटील, तसेच गोकुळचे वरिष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ यांनी कार्यक्रमादरम्यान दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांचे पूजन करून शुभेच्छा दिल्या.
advertisement
मुश्रीफ म्हणाले, “गेल्या साडेचार वर्षांत गाईच्या दुधाच्या खरेदी दरात ८ रुपये आणि म्हशीच्या दुधात १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. काटकसर व्यवस्थापन आणि पारदर्शक निर्णयप्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना अधिक दर देणे शक्य झाले आहे.” त्यांनी माजी संचालक शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘जवाब दो’ निषेध मोर्चावर टीका केली. “गोकुळमध्ये डिबेंचर प्रणाली सुरू करणारे त्यांचे सासरे महादेवराव महाडिक होते, आणि आता त्याच प्रणालीवर आंदोलन करणे हे विरोधाभास आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
आमदार सतेज पाटील यांनीही मुश्रीफ यांच्या मताला पाठिंबा देत सांगितले, “गोकुळ ही व्यापाऱ्यांची संस्था नाही, ती शेतकऱ्यांची आहे. आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काम केले आहे. कोणाच्याही वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे, तर सहकार चळवळीच्या बळकटीसाठी गोकुळ उभा आहे.”
गोकुळचे वरिष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी या दरवाढीला शेतकऱ्यांसाठीची “दिवाळी भेट” असे संबोधले. ते म्हणाले, “संस्थेने व्यवस्थापन खर्चात १ रुपयांची कपात केली असून, पशुखाद्याच्या किमतीत ५० रुपयांनी घट केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. डिबेंचर प्रणाली ३२ वर्षांपासून चालू आहे आणि संस्थेचा नफा वाढल्यामुळे मुंबई आणि पुणे बाजारपेठेत विस्तारासाठी डिबेंचर कपात करावी लागली.”
advertisement
या दरवाढीचा परिणाम ग्राहकांवर तात्काळ होणार नसला तरी, गोकुळने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वीच झालेल्या या घोषणेमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
October 18, 2025 8:54 AM IST