Sheti Anudan : सरकारकडून गुड न्यूज! या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील दोन वर्षांपासून थांबलेली अनुदानाची रक्कम अखेर वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.
26 हजार 981 शेतकऱ्यांना मिळाले अनुदान
जिल्ह्यातील 26,981 शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 125.44 कोटी रुपयांपैकी 106.49 कोटी रुपये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. त्यातील 101.33 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. या योजनेद्वारे ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि स्प्रिंकलर सिंचन यांसारख्या आधुनिक पद्धतींना चालना देण्यासाठी 50 ते 100 टक्के अनुदान दिले जाते.
advertisement
2023-24 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी सिंचन अनुदान योजनेचा लाभ घेतला असला तरी निधी वितरणाची प्रक्रिया रखडली होती. अखेर केंद्र सरकारकडून अनुदानाचा काही भाग मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
29.30 कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा कायम
योजनेअंतर्गत अद्याप 5671 शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळालेले नाही. त्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी 29.30 कोटी रुपये प्रलंबित आहेत. विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे अर्ज अपूर्ण असल्याने काही लाभार्थ्यांना अनुदान देणे शक्य झालेले नाही. त्याचबरोबर, 2022-23 मध्ये अर्ज केलेल्या काही शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला असून त्यांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा
सरकारने राबवलेल्या या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ‘प्रति थेंब अधिक पीक’ हे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल. पाणीटंचाई व हवामानातील बदलांमुळे सिंचन व्यवस्थेचा विकास होणे अत्यावश्यक आहे, आणि या योजनेंतर्गत दिले जाणारे अनुदान यासाठी उपयुक्त ठरत आहे.
अनुदान त्वरित मिळावे यासाठी प्रशासनाचा प्रयत्न
जिल्हा कृषी विभाग उर्वरित अनुदानाचे वितरण लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि माहिती पूर्ण भरावी, जेणेकरून अनुदान वाटपाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
advertisement
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही, त्यांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी मागणी केली आहे. जर शिल्लक 29.30 कोटींचा निधी तातडीने वितरित झाला, तर हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 30, 2025 4:40 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Sheti Anudan : सरकारकडून गुड न्यूज! या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा


