Farmer Success Story : आले पिकात सूर्यफुलाचे आंतरपीक, शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी, मिळालं 1 लाख रुपये उत्पन्न
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
आलेपिकात आंतरपीक म्हणून सूर्यफुल लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. सांगलीचे शेतकरी राजेंद्र मोहिते यांनी अभिनव प्रयोग केला आहे.
सांगली: आले पिकात आंतरपीक म्हणून सूर्यफूल लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावचे प्रगतशील शेतकरी राजेंद्र मोहिते यांनी अभिनव प्रयोग केला होता. उन्हाळ्याच्या दिवसात आले पिकाला असलेली सावलीची गरज म्हणून आंतरपीक घ्यावे लागते. आंतर पिकाची निवड करताना त्यांनी मित्राच्या सल्ल्याने लोकप्रिय आंतरपीक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यफूल पिकाची निवड केली. विशेष म्हणजे आल्यात सूर्यफूल आंतरपीक घेण्याचा हा पहिलाच प्रयोग होता.
एक एकर आल्याच्या पिकामध्ये केलेल्या या अभिनव प्रयोगातून मोहिते यांना 100 दिवसात एक लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. आल्याच्या खतावर सूर्यफूल वाढले. यासाठी वेगळी एकही रुपयाची खते किंवा औषधे फवारली नाहीत. दीड फुटाच्या अंतरावर बिया टोकून घेतल्या आणि सहा वेळा भुईपाटाने पाणी दिले, असं प्रयोगशील शेतकरी राजेंद्र मोहिते म्हणाले.
advertisement
रब्बी हंगाम पोषक
प्रयोगशील शेतकरी मोहिते यांनी गंगा-कावेरी या संकरित सूर्यफूल वाणाची लागवड केली होती. त्यांच्या अनुभवानुसार हे वाण खरीप पेक्षा रब्बी हंगामात उत्तम पिकते. गंगा-कावेरी फुलण्यासाठी रब्बीतील हवामान पोषक असून या दिवसात रोग, किडीचा कमी प्रादुर्भाव यामुळे उत्पादनाचा उतारा चांगला मिळतो.
advertisement
पोपटांचा उपद्रव
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सूर्यफुलाची लागवड केली होती. मार्च महिन्यामध्ये बिया भरू लागताच पोपटांचे थवे शेतामध्ये येऊ लागले. पोपटांपासून सूर्यफूल वाचवण्यासाठी त्यांनी प्रत्येक सूर्यफुलास प्लास्टिकच्या पिशव्या बांधल्या होत्या. परंतु दुसऱ्याच दिवशी उष्णतेने पिशव्यांना पाणी सुटल्याचे लक्षात येताच त्यांनी सर्व पिशव्या सोडून टाकल्या. राखण करण्याच्या पारंपरिक पद्धतीनेच सूर्यफूल पोपटांपासून वाचवल्याचे मोहिते सांगतात.
advertisement
दुहेरी फायदा
उत्तम प्रतीच्या शेतजमिनीमध्ये आले पिकासाठी मशागत झाल्याने सूर्यफुलाचे पीक जोमदार फुलले. दुय्यम पीक म्हणून फुलत असताना सूर्यफुलाच्या मोठ्या जाड पानांनी मुख्य पीक असलेल्या आल्यावरती सावलीचे आच्छादन घातले. यामुळे कडक उन्हाळ्यात आल्याचे संरक्षण झाले. शिवाय ऊस पट्ट्यामध्ये अत्यंत दुर्मिळ होत चाललेले सूर्यफूल देखील फुलले.
मोहिते यांना एक एकर आंतरपीक प्रयोगातून 10 क्विंटल सूर्यफूल मिळाल्याने सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्यांना 1 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले. मुख्य पीक असलेल्या आल्याचे बाजारभाव यंदा कोसळले आहेत. यामुळे आंतरपिकातून मिळालेल्या समाधानकारक नफ्यामुळे दिलासा मिळाल्याचे प्रयोगशील शेतकरी राजेंद्र मोहिते यांनी सांगितले.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
May 16, 2025 9:45 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story : आले पिकात सूर्यफुलाचे आंतरपीक, शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी, मिळालं 1 लाख रुपये उत्पन्न