4 वर्षांत 1 रुपया मिळाला नाही, 30 हजार एकरावर सांगलीच्या शेतकऱ्यांनी चालवली कुऱ्हाड
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Vineyard Farming: सांगली जिल्हा हा द्राक्षांच्या शेतीसाठी ओळखला जातो. परंतु, गेल्या 5 वर्षांत सततच्या नुकसानीमुळे द्राक्ष बागायतदार संकटात सापडला आहे.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली: महाराष्ट्रात सांगली जिल्हा द्राक्ष शेतीसाठी देखील ओळखला जातो. परंतु, गेल्या काही काळात आस्मानी आणि सुलतानी संकटाने द्राक्ष बागायतदार संकटात सापडला आहे. सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी घातलेला खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. त्यात खते, औषधांच्या किमती आणि शेत मजुरांचा प्रश्न यामुळे द्राक्ष उत्पादक हतबल झाले आहेत. मागील 2 वर्षांत तब्बल 30 हजारांहून अधिक एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली आहे. याबाबत लोकल18 ने तासगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांशी संवाद साधला.
advertisement
तासगाव तालुक्यातील वासुंबे येथे विशाल खराडे या शेतकऱ्याची 11 एकर शेती आहे. उत्पादन खर्च परवडत नसल्याने त्यांनी केवळ 3 एकर क्षेत्रावर द्राक्ष बाग लावली. तर उर्वरित शेतीत उसाचे उत्पादन घेतले. 3 एकर क्षेत्रात गेल्या 5 वर्षांपासून 1 रुपयाचा देखील फायदा झाला नाही. उलट उसाच्या शेतीतून आलेलं उत्पन्न देखील द्राक्ष शेतीसाठी भांडवल म्हणून उडवलं. खते आणि विक्रेत्यांचे तसेच रोजगारांचे पैसे भागवण्यातच द्राक्ष बागायतदार पिळून निघत असल्याचे विशाल खराडे म्हणाले.
advertisement
“नोटाबंदीनंतर द्राक्ष विक्री दरात वाढ झालेली नाही. यानंतर करोना टाळेबंदीचा दुसरा फटका बसला. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळासारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत राहिला. त्यामुळे उत्पादन घटत गेले आणि उत्पादन खर्च वाढत राहिला. द्राक्षबागायतदारांवर कर्जाचे डोंगर वाढतच राहिले. त्यामुळे द्राक्ष बाग काढून टाकण्याशिवाय पर्यायच राहिला नसल्याचे शेतकरी खराडे सांगतात.
advertisement
4 वर्षांत रुपयाचा फायदा नाही
लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने गावी परतलेला तरुण अतुल गेल्या पाच वर्षांपासून शेतीकडे वळला आहे. एक एकर द्राक्ष बाग पिकवण्यासाठी वर्षाला कर्ज काढून 3 ते साडेतीन लाख खर्च करत आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून एक रुपयाही हातात राहिला नाही. यंदा तर अवकाळी आणि सततच्या हवामान बदलाने बागेत द्राक्षच आली नाहीत.”आमच्या शेतात येणारे रोजगारी आमच्यापेक्षा सुखी आहेत. पण आम्हा द्राक्ष बागायतदारांचा हातात काहीच राहत नाही. नुसता कर्जाचा डोंगरच वाढत चाललाय," अशी खंत अतुल यांनी व्यक्त केली.
advertisement
आम्ही जगायचं कसं?
तुरची येथील शेतकरी शांताबाई खरात यांनी देखील आपली खंत बोलून दाखवलीये. "इतक्या वर्षांपासून द्राक्षबाग करतोय. पण इतकी परवड कधीच झाली नव्हती. यंदा बागेला फळच आले नाही. केलेला खर्च सगळा वाया गेला. आता खर्च घालण्याची ताकद उरली नाही. म्हणून बागच तोडून टाकली. आता आम्ही जगायचं कसं?" असा प्रश्न त्या करतात.
advertisement
खर्चात तिपटीने वाढ
दरम्यान, शांताबाई आजींच्या जगण्याचा प्रश्नावरून द्राक्ष उत्पादकांची अवस्था लक्षात येते. एकेकाळी सर्वाधिक नफा मिळवून देणारे पीक म्हणून द्राक्ष शेतीकडे पाहिले जात होते. पाच वर्षांपूर्वीपर्यंत वर्षाकाठी एक ते दीड लाख रुपये खर्च केल्यानंतर बागेतून 4 ते 6 लाख रुपये उत्पन्न मिळत होते. मात्र, मागील पाच वर्षांत सातत्याने बसणारा हवामान बदलाचा फटका, द्राक्ष उत्पादकांच्या बाबतीत शासनाची उदासीन भूमिका, खते, औषधांच्या वाढत्या किमती, शेतमजुरांचे वाढलेले दर यामुळे उत्पादन खर्चात तिपटीने वाढ झाली आहे.
advertisement
4 हजार कोटींचा उद्योग धोक्यात
view commentsसांगली जिल्ह्यात सुमारे 80 हजार एकर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे. हवामान बदल, शासनाची उदासीन भूमिका आणि सातत्याने होणारे नुकसान, यामुळे 30 हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे. द्राक्ष पीक संकटात सापडल्याने केवळ द्राक्ष बागायतदारच नव्हे तर सांगली जिल्ह्यातील 4 हजार कोटींचा द्राक्ष उद्योग धोक्यात सापडला आहे. द्राक्ष उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रथम लाखोंचा पोशिंदा असणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी शासन, प्रगतशील शेतकरी, द्राक्ष संशोधन संस्था, द्राक्ष बागायतदार संघ द्राक्ष आणि बेदाणा पट्ट्यातील बाजार समित्या यांनी एकत्रित प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
December 13, 2024 3:42 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
4 वर्षांत 1 रुपया मिळाला नाही, 30 हजार एकरावर सांगलीच्या शेतकऱ्यांनी चालवली कुऱ्हाड

