धाराशिवमध्ये ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, पिकाची वाढ खुंटून शेतकऱ्यांचे नुकसान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेले ज्वारीचे पीक जोमदार वाढीच्या अवस्थेत असतानाच या कोवळ्या लुसलुशीत पिकावर अमेरिकन लष्करी अळीने हल्ला चढविल्याने वाढ खुंटत आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : मका पिकाला उद्धवस्त करणाऱ्या घातक अशा अमेरिकन लष्करी अळीने आता ज्वारी पिकाकडे आपला मोर्चा वळविला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेले ज्वारीचे पीक जोमदार वाढीच्या अवस्थेत असतानाच या कोवळ्या लुसलुशीत पिकावर अमेरिकन लष्करी अळीने हल्ला चढविल्याने वाढ खुंटत आहे. धाराशिवमधील भूम तालुक्यातील पाथरूड, ईट,आंबी परिसरात सध्या वाढीच्या अवस्थेत असलेल्या ज्वारीवर लष्करी अळीने हल्ला चढविल्याचे दिसत आहे.
advertisement
शेतकऱ्यांचे नुकसान
भूम तालुक्यातील पाथरुड, ईट आंबी परिसरात यावर्षी चांगल्या पर्जन्यमानामुळे जवळपास शेकडो हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पेरणीचा अंदाज आहे. या भागातील बहुतांश पेरणी झाली असून, अजूनही पेरणीचे काम वापसा येईल त्याप्रमाणे सुरूच आहे. दरम्यान, एकीकडे ज्वारी पेरणी सुरू असतानाच दुसरीकडे सुरुवातीला पेरलेल्या ज्वारीवर घातक अशा अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने ही अळी ज्वारीचा पोंगाच (शेंडाच) फस्त करीत असून, पिकाची वाढ खुंटून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
advertisement
ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचाप्रादुर्भाव झाल्यास ही अळी सुरुवातीस ज्वारीची पाने पोखरते. त्यामुळे पाने कुरतडलेली दिसतात आणि पानांमध्ये मोठ्या प्रमाणात अळीची विष्ठा दिसते. अळी थेट पोग्यात जाऊन पोगाच बुडातून कुरतडत असल्यामुळे त्या चिपाडाची वाढ खुंटते आणि त्यापासून उत्पन्न मिळत नाही.
advertisement
शिवाय योग्य वाढीचे चिपाडही होत नाही. एकंदरीतच अशा प्रकारे ही अळी संपूर्ण क्षेत्रावर फैलाव करते. त्यामुळे अमेरिकन लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी ज्वारी उत्पादक शेतकरी संदीपान कोकाटे यांनी केली आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
November 06, 2024 2:10 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
धाराशिवमध्ये ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, पिकाची वाढ खुंटून शेतकऱ्यांचे नुकसान