मोसंबीला विक्रमी 30 हजार रुपये टन भाव, पण शेतकरी नाराज, जालन्यातील परिस्थिती नेमकी काय?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
jalna sweet lemon - मोसंबीला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आनंदी आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी 12 ते 18 हजार रुपये टनांच्या दरम्यानच मोसंबीची विक्री केली आहे. त्यामुळे हंगाम संपल्यानंतर दरवाढ झाल्याने शेतकरी असमाधानी असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना - जालना जिल्ह्याची ओळख मोसंबीचा जिल्हा म्हणून आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मोसंबी बागा आहेत. तसेच मोसंबी पिकाला भौगोलिक मानांकन देखील मिळालेला आहे. जालना शहरात उत्पादित झालेली मोसंबी उत्तर भारतातील दिल्ली, जयपूर, कानपूर, लखनऊ, वाराणसी, कोलकत्ता बंगळूर, हैदराबाद अशा देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये जाते. सध्या पंजाब राज्यात उत्पादित होणारा मालटा हा कमी प्रमाणात उत्पन्न होणार असल्याने महाराष्ट्रातील मोसंबीला मोठी मागणी वाढली आहे. याचाच परिणाम दरावर झाला असून बुधवारी विक्रमी 30 हजार रुपये प्रति टन एवढा दर मिळाला आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
जालना मोसंबी बाजारात मोसंबीचे दर तेजीत आहेत. मोसंबीची आवक घटल्याने तसेच बाहेर राज्यात मागणी वाढल्याने मोसंबीची दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या जालना मोसंबी बाजारात दररोज 100 ते 120 टन मोसंबीची आवक होत आहे. या मोसंबीला गुणवत्तेनुसार 25 ते 30 हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे.
मोसंबीला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आनंदी आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी 12 ते 18 हजार रुपये टनांच्या दरम्यानच मोसंबीची विक्री केली आहे. त्यामुळे हंगाम संपल्यानंतर दरवाढ झाल्याने शेतकरी असमाधानी असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, जालना मोसंबी बाजारात सध्या आंबिया बहाराची मोसंबी दाखल होत असून आंबिया बहाराचे हंगाम शेवटाकडे आला आहे. हंगामाच्या सुरुवातीला मोसंबीला 12 हजार रुपये प्रति टन ते 18 हजार रुपये प्रति टन असा दर मिळाला.
advertisement
मोसंबी पिकाला असलेली फळगळीची समस्या यामुळे शेतकऱ्यांचे 30 ते 50 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. त्यात अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मोसंबी बागा जेसीबीद्वारे काढण्याचे निर्णयही घेतले. हंगामाच्या शेवटी मोसंबीची दरवाढ झाल्याने या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांना जास्त होणार आहे.
advertisement
सध्या बाजारात आपल्या मोसंबीला मागणी वाढली आहे. याचे कारण म्हणजे पंजाबमधील मालटा यंदा कमी आहे. त्यामुळे मोसंबीचे भाव वाढलेले आहेत. सध्या हिरव्या माला 30 हजार रुपये प्रति टनपर्यंत भाव मिळत आहे. आगामी काळात मोसंबीचे भाव आणखी वाढू शकतात. मात्र, शेतकऱ्यांनी जास्त भाव वाढीची अपेक्षा न ठेवता मोसंबीची विक्री करावी. कारण, जास्त वेळ झाडावर मोसंबी राहिल्यास फळाची गुणवत्ता खराब होते व त्याला चांगला दर मिळत नाही, असे व्यापारी राजेश पखाले यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
October 16, 2024 5:33 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
मोसंबीला विक्रमी 30 हजार रुपये टन भाव, पण शेतकरी नाराज, जालन्यातील परिस्थिती नेमकी काय?