गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? किती पैसे मिळतात?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : राज्यातील शेतकरी शेतीसाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात. मात्र, शेती करताना अपघातांची जोखीम कायम असते
मुंबई : राज्यातील शेतकरी शेतीसाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात. मात्र, शेती करताना अपघातांची जोखीम कायम असते. सर्पदंश, विजेचा धक्का, पाण्यात बुडणे, रस्ते अपघात, जंतुनाशकांची विषबाधा अशा अनेक कारणांमुळे दरवर्षी हजारो शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. अशा संकटाच्या क्षणी शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला आहे.
advertisement
या योजनेतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता तिची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे. यापूर्वी विमा कंपन्यांमार्फत ही योजना चालवली जात होती. मात्र, दावा मंजूर होण्यास विलंब, कागदपत्रांची पूर्तता आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी कुटुंबे वंचित राहत होती. हे लक्षात घेऊन शासनाने विमा कंपनीचा मध्यस्थपणा वगळत, थेट शासकीय सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मदत अधिक जलद आणि अडथळ्यांशिवाय मिळणार आहे.
advertisement
ऑनलाईन अर्ज कुठे करायचा?
आता या योजनेसाठी शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना mahadbt.maharashtra.gov.in या महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करता येतो. ज्यांना ऑनलाईन अडचण आहे, त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्जाची सुविधाही उपलब्ध ठेवण्यात आली आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात असून, पारदर्शकता वाढवण्यावर शासनाचा भर आहे.
advertisement
या योजनेअंतर्गत अपघाताच्या तीव्रतेनुसार आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते. अपघातात दोन्ही डोळे किंवा दोन हात-पाय कायमचे निकामी झाल्यासही तेवढीच रक्कम मिळते. तर एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते.
advertisement
पात्रतेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. लाभ घेणारा शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याचे नाव 7/12 उताऱ्यावर वहितीधारक म्हणून नोंदलेले असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी वयोमर्यादा 10 ते 75 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे खातेदार शेतकऱ्यासोबतच त्याच्या कुटुंबातील एका सदस्यालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन व्यक्ती कव्हर केल्या जातात.
advertisement
कोणत्या अपघातांना अनुदान मिळते?
शासन निर्णयानुसार रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडणे, विजेचा धक्का, सर्पदंश, विंचूदंश, जनावरांचा हल्ला, उंचावरून पडणे, जंतुनाशकांमुळे विषबाधा, दंगल, खून तसेच नक्षलवादी हल्ल्यातील मृत्यू किंवा दुखापती या योजनेअंतर्गत ग्राह्य धरल्या जातात.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 10, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? किती पैसे मिळतात?









