हवामान स्थिती
सध्या उत्तर ओडिशा आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही हवामान प्रणाली झारखंडकडे सरकण्याची शक्यता आहे. दरम्यान, मॉन्सूनशी संबंधित कमी दाबाचा पट्टा बिकानेरपासून जयपूर, दामोह, पेंद्रारोड, संबलपूर, ठळक कमी दाबाचे केंद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच विदर्भ आणि आसपासच्या भागातही चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव दिसून येत आहे.
advertisement
पावसाचा आढावा
मंगळवारी (3 सप्टेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासांत कोकण व घाटमाथा भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या, तर उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी 31.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून विदर्भ व मराठवाड्यात ढगाळ हवामान तर राज्याच्या इतर भागात उन-सावल्यांच्या खेळासोबत सरींचा अनुभव आला.
कुठे कोणता अलर्ट?
ऑरेंज अलर्ट : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, नाशिक, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
येलो अलर्ट : मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, जळगाव, बुलडाणा, अकोला.
येलो अलर्ट : अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
हवामान खात्याने शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी दक्षता घेण्याचा सल्ला दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला
1) सोयाबीन
सततच्या पावसामुळे पाने व शेंगांवर तांबेरा (रस्ट) व आल्टरनेरिया रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियंत्रणासाठी हेक्साकोनाझोल 5% EC (2 मि.लि./लिटर पाणी) किंवा मॅनकोझेब 75% WP (25 ग्रॅ./10 लिटर पाणी) फवारणी करावी.
2) कापूस
पावसाळ्यात फुलकिडे व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% SL (0.3 मि.लि./लिटर पाणी) किंवा असेटामिप्रिड 20% SP (0.25 ग्रॅ./लिटर पाणी) फवारणी उपयुक्त ठरेल. बोंड अळीवर नियंत्रणासाठी स्पिनोसायड 45% SC (0.3 मि.लि./लिटर पाणी) फवारणी करावी.
3) भाजीपाला पिके (टोमॅटो, मिरची, भोपळा वर्गीय)
सततच्या पावसामुळे अळ्या व कुज रोग वाढण्याचा धोका असतो. बुरशीजन्य रोगांवर नियंत्रणासाठी कॉपपर ऑक्सीक्लोराईड (25 ग्रॅ./10 लिटर पाणी) किंवा मॅनकोझेब (25 ग्रॅ./10 लिटर पाणी) फवारणी करावी. रस शोषक किडींवर नियंत्रणासाठी थायोमेथॉक्साम 25% WG (0.25 ग्रॅ./लिटर पाणी) फवारणी करावी.