कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात, त्यामुळे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम
मान्सूनचा प्रभाव असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या गंगानगरपासून भिवानी, आग्रा, बांदा, देहरी, पुरुलिया, कोलकता ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच पश्चिम बंगाल परिसरातील चक्राकार वाऱ्यांच्या परिणामामुळे उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालच्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असून दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत त्याचा विस्तार झाला आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर विशेषतः कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अधिक राहिला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत ताम्हिणी येथे सर्वाधिक 170 मिमी पावसाची नोंद झाली. अनेक भागांत 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. इतर भागांत मात्र हलकासा पाऊस पडत राहिला. परभणीत शनिवारी राज्यातील उच्चांकी 34 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले.
कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
रेड अलर्ट - पुणे जिल्ह्यातील घाटमाथा
ऑरेंज अलर्ट – पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा
येलो अलर्ट - मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर
दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. घाटमाथा आणि कोकण परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, तर शहरी भागांत जोरदार सरी आणि विजांच्या कडकडाटामुळे वाहतुकीवर व विजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.