जालना : पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून शेतकरी नवनवीन पिकांचा शोध घेत आहेत. गहू, हरभरा या रब्बी हंगामातील पिकांना पर्याय म्हणून उत्तर भारतातील राजमा हे पीक पुढे येत आहे. मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील शेतकरीही राजमा पिकाचा प्रयोग आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कीड, रोगांना कमी प्रमाणात बळी पडावे लागत असल्याने तसेच उत्पन्न चांगले होत असल्याने देखील शेतकऱ्यांचा राजमा पिकाकडे कल असल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील मानेगाव येथील शेतकरी विष्णू गुळवे यांनी देखील राजमा पिकाचा प्रयोग केला आहे. पाहुयात राजमा पिकाची शेती कशा प्रकारे केली जाते आणि त्यातून किती उत्पन्न मिळते.
advertisement
उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर राजमा पिकाचा वापर होतो. मात्र गहू, हरभरा या पिकांना बाजारात मिळत असलेला कमी दर यामुळे शेतकरी राजमा या नवीन पिकाकडे वळत असल्याचे चित्र आहे. जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी राजमा पेरल्याचे पाहायला मिळत आहे. विष्णू गुळवे यांनी आपल्या दोन एकर शेतामध्ये राजमा पिकाची लागवड केली आहे. या पिका बाबत त्यांना भिलपुरी येथील शेतकरी दुर्गादास पुरी यांच्याकडून माहिती मिळाली. नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी एकरी 30 किलो याप्रमाणे राजमा बियाण्याची आपल्या शेतामध्ये पेरणी केली.
सांगलीचा चांगला शेतकरी, केळीमधून 11 महिन्यात कमावले 11 लाख रुपये! Video
बियाण्याची पेरणी करत असताना 20-20-0-13 त्या खताची देखील पेरणी केली. पीक मोठे झाल्यानंतर दोन वेळा कीटकनाशकांची फवारणी केली. तसेच हलक्या जमिनीमध्ये सहा ते सात वेळा पाणी दिले आणि भारी जमिनीमध्ये तीन ते चार वेळा पाणी दिले. सध्या त्यांच्या दोन्ही शेतामधील राजमा पीक बहराला आहे. राजमा या पिकाचे एकरी 8 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील केज धारूर येथे याचे मार्केट आहे. या पिकाला 7 हजार रुपये प्रति क्विंटल ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो. तर एकरी 1 लाखापर्यंत उत्पन्न केवळ अडीच महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळते. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर या पिकाकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
इतर पिके आलेली व हे पीक गेलेले असेल तरी परवडते असे या पिकाचे वर्णन करता येईल. फक्त अडीच महिन्यांमध्ये हे पीक काढणीला येते. याला वजन देखील चांगले आहे. एका शेंगेमध्ये पाच ते सहा दाणे येतात. राजम्याचा एक कट्टा 70 किलो पर्यंत वजन देतो. भारी जमिनीमध्ये 10 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते. त्यामुळे माझ्यासह अन्य शेतकरी राजमा पिकाकडे वळत असल्याचे शेतकरी विष्णू गुळवे यांनी सांगितले.





