या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कापूस, उडीद, मूग यांसारख्या खरीप पिकांना बसला आहे. अनेक शेतजमिनींमध्ये पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना अक्षरशः जलसमाधीचा धक्का बसला आहे. आधीच उत्पादन खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस अधिकच संकटात ढकलणारा ठरला आहे. आता आगामी दिवसांमध्ये ही पिके सावरतील की पूर्णपणे नष्ट होतील याबाबत शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.
advertisement
आभाळ फाटलं! परभणीत काळ बनून आला पाऊस, शेतकरी संकटात, शेकडो हेक्टर शेती पाण्यात, Video
बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरात तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या डोळ्यांसमोर मेहनतीची शेती वाहून जाताना पाहिली. येथील शेतकरी धर्मराज सुरवसे यांनी लोकल 18 शी बोलताना आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या. आमच्या शेतातील कापूस आणि सोयाबीन पिके संपूर्ण पाण्याखाली गेली आहेत. मेहनत, वेळ आणि खर्च सगळं काही वाहून गेलं. आता पुढचं पीक घेण्याची देखील परिस्थिती नाही, असे सुरवसे यांचे म्हणणे आहे.
मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते, वाडीवस्त्या आणि शेतातील बांध तुटून वाहून गेले आहेत. वाहतूक विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचणेही कठीण झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचे संकटही उभे राहिले असून शेतकऱ्यांची चिंता दुप्पट झाली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत.
एकूणच बीड जिल्ह्यातील पावसामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप परिस्थितीचे आकलन करण्याचे काम सुरू केले असून, शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम धोक्यात आला असून, सरकारने तत्काळ मदत जाहीर करण्याची गरज निर्माण झाली आहे.