ही योजना पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. हवामानावर आधारित या योजनेचा उद्देश म्हणजे पिकांच्या उत्पादनावर हवामानातील बदल, दुष्काळ, अतिवृष्टी, उष्णतेची लाट, गारपीट यांसारख्या घटकांचा परिणाम झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे.
नोंदणीच्या अंतिम तारखा
कृषी विभागाच्या माहितीनुसार, विविध पिकांसाठी विमा अर्जाची अंतिम मुदत पुढीलप्रमाणे आहे.
advertisement
द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी : १५ ऑक्टोबर २०२५
केळी, मोसंबी आणि पपई : ३१ ऑक्टोबर २०२५
संत्रा : ३० नोव्हेंबर २०२५
आंबा : ३१ डिसेंबर २०२५
डाळिंब : १४ जानेवारी २०२६
या तारखांनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत नोंदणी करणे आवश्यक आहे.
योजनेचे स्वरूप आणि अटी
ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. म्हणजेच, दोन्ही प्रकारचे शेतकरी स्वतःच्या इच्छेनुसार या योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेत सहभागी होण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. जसे की, संबंधित फळबाग किमान २० गुंठे आणि जास्तीत जास्त ४ हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्रात असावी.
शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, फळबागेचा जिओ-टॅग केलेला फोटो, तसेच ई-पीक पाहणी पूर्ण केलेली असावी. जर जमीन भाडेपट्टीवर घेतलेली असेल, तर नोंदणीकृत भाडेकरार आवश्यक राहील. योजनेत सहभागी होण्यासाठी घोषणापत्र भरून सादर करणे बंधनकारक आहे.
हवामान आधारित संरक्षण
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे हवामानातील बदलामुळे होणाऱ्या फळपिकांच्या नुकसानीवर थेट भरपाई मिळवून देणे. हवामानाच्या आकडेवारीच्या आधारे नुकसानाचे मूल्यांकन केले जाईल आणि विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होईल. त्यामुळे पीक नुकसानीची तपासणी, पंचनामे किंवा प्रशासकीय विलंब टळतील.
अधिक माहितीसाठी काय करावे?
योजनेबाबत अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी जवळील कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अधिकृत संकेतस्थळ https://pmfby.gov.in/ ला भेट द्यावी.