ST Bus : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! दिवाळीसाठी पुण्यातून 598 विशेष बस; जाणून घ्या कुठून सुटणार एसटी?
Last Updated:
MSRTC Extra Buses For Diwali From Pune : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. दिवाळीनिमित्ताने जास्त बस धावणार असून मात्र त्याचा मार्ग कसा असेल ते एकदा जाणून घ्या.
पुणे : दिवाळीचा उत्सव आता अगदी जवळ आला आहे. घराघरांत सणाची लगबग सुरू झाली आहे. दिवाळी म्हटलं की नातेवाईकांना भेटणे आणि आपल्या गावी जाण्याची आतुरता असते. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने नागरिक आपल्या गावी जाण्यासाठी तयारी करत आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने राहणारे अनेकजण दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावी जातात. मात्र यंदा रेल्वेचे बुकिंग पूर्णपणे फुल झाले असून, प्रवाशांना तिकीट मिळण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने एकूण 598 जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बस 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना आपल्या गावी जाण्यासाठी सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
यंदा पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड आगारातून विशेष एसटी बस सेवा सुरू करण्यात येत आहे. याशिवाय शिवाजीनगर आणि स्वारगेट या प्रमुख आगारांमधूनही जादा बस सोडण्यात येणार आहेत.
advertisement
पुणे विभागातून अशी असेल बसची सोय
शिवाजीनगर आगारातून: 80 बस
स्वारगेट आगारातून: 112 बस
पिंपरी-चिंचवड आगारातून: 396 बस
अशा प्रकारे एकूण 598 अतिरिक्त बस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत. या बसद्वारे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, लातूर, बीड, परभणी, अकोला, आणि नागपूर अशा विविध जिल्ह्यांकडे सेवा पुरवली जाणार आहे.
या विशेष बस सेवेमुळे दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गर्दीच्या काळात रेल्वे किंवा खासगी प्रवासाच्या पर्यायांवर ताण येत असतो. परंतु एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित आणि परवडणारा प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.
advertisement
महामंडळाने जाहीर केले आहे की, या बसचे ऑनलाइन आरक्षण आता सुरू झाले आहे. प्रवासी एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://msrtc.maharashtra.gov.in) किंवा मोबाइल अॅपवरून आपल्या प्रवासाचे तिकीट सहज बुक करू शकतात. गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनी आधीच आरक्षण करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दिवाळीच्या या काळात रस्त्यांवरील गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी संयम बाळगावा आणि वाहतुकीचे नियम पाळावेत असेही आवाहन करण्यात आले आहे. एकंदरीत परिवहन महामंडळाच्या या निर्णयामुळे नागरिकांची दिवाळी अधिक आनंददायी आणि सुखकर होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 1:18 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
ST Bus : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! दिवाळीसाठी पुण्यातून 598 विशेष बस; जाणून घ्या कुठून सुटणार एसटी?