October Weather: दुपारी 12 ते 3 घरीच थांबा, धो धो पावसानंतर महाराष्ट्रावर नवं संकट! ऑक्टोबर महिन्यात कसं असेल हवामान? Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
October Weather: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. हवामान तज्ज्ञांनी ऑक्टोबर हीटबाबत महत्त्वाचं भाकित केलंय.
पुणे : सप्टेंबर महिन्यात राज्यभरात, विशेषतः मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता ऑक्टोबर महिना सुरू झाला असून, हवामानात हळूहळू बदल जाणवू लागले आहेत. ‘ऑक्टोबर हिट’चा परिणाम पुण्यासह राज्यातील अनेक भागात जाणवू लागला आहे. मात्र, या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात या महिन्यात सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने तापमान कमी राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच दिवसाच्या तापमानात वाढ होताना दिसते आहे. तरीदेखील, राज्यातील एकूण तापमानाचा विचार केला तर ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच, उष्णतेची लाट तीव्र स्वरूपात न येता, तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.
advertisement
सानप यांनी पुढे सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात जी उष्णता पडते, ती शेतीसाठी उपयोगी ठरते. विशेषतः ज्या भागात अलीकडेच अतिवृष्टी झाली, त्या भागात आता पडणार ऊन पाण्याचा निचरा होण्यास मदत करेल आणि पिकांच्या पुनरुत्थानास चालना देईल.
मान्सूनमधील वाऱ्यांची तीव्रता कमी झाल्यामुळे वातावरणातील आर्द्रतेत घट झाली आहे. ढगाळ वातावरण आता कमी दिसत असून, सकाळच्या गारव्यानंतर दुपारी ऊन चांगले पडत आहे. पुण्यात सध्या तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, पुढील काही दिवसांत पारा 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
advertisement
पुण्यात ‘ऑक्टोबर हिट’चा परिणाम नागरिकांना जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळी रस्त्यावर फिरताना अंगाला झोंबणारी उष्णता जाणवते. विशेषतः दुपारी बारा ते तीन या वेळेत बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तापमान अचानक वाढल्यामुळे निर्जलीकरण, थकवा किंवा उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे परिधान करणे आणि थेट सूर्यप्रकाशापासून बचाव करणे आवश्यक आहे.
advertisement
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ही उष्णता शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीत पाणी साचून राहिले होते. सध्याच्या उष्ण वातावरणामुळे ते पाणी सुकण्यास मदत होईल आणि पिकांची वाढ सुधारेल. विशेषतः सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांसाठी हा कालावधी अनुकूल राहणार आहे.
एकूणच, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ होत असली तरी सरासरीपेक्षा किंचित कमी तापमानामुळे तीव्र उष्णतेची भीती नाही. मात्र, दुपारच्या सुमारास ‘ऑक्टोबर हिट’चा परिणाम निश्चितच जाणवेल. त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 08, 2025 12:57 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
October Weather: दुपारी 12 ते 3 घरीच थांबा, धो धो पावसानंतर महाराष्ट्रावर नवं संकट! ऑक्टोबर महिन्यात कसं असेल हवामान? Video