Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या! दिवाळीत 'या' फटाक्यांवर संपूर्ण बंदी; आदेश मोडल्यास... पुणे पोलिसांचा सज्जड इशारा
Last Updated:
Pune Diwali Firecrackers Ban 2025 : दिवाळी दरम्यान पुणे पोलिसांनी काही फटाक्यांवर पूर्ण बंदी घालली आहे. पुणेकरांनी सुरक्षित आणि शांत दिवाळी साजरी करावी असा पोलिसांचा आग्रह आहे.
पुणे : येत्या काही दिवसांत दिवाळीचा उत्सव सगळीकडे साजरा होणार आहे. दिवाळी म्हटलं की फटाक्यांचा आवाज. पण याच फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे अनेक नागरिक त्रस्त होतात. पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी काही फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अधीन घेण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी फटाक्यांवर काही मर्यादा लागू करण्यात आल्या आहेत. ध्वनी प्रदूषण करणारे, जास्त आवाजाचे फटाके यांच्यावर सक्त बंदी असेल. तसेच शहरातील काही शांतता क्षेत्रांमध्ये फटाके फोडणे पूर्णपणे बंद असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नेमके नियम काय आहेत?
ध्वनी मर्यादा:
फटाक्यांचा आवाज 124 डेसिबलपेक्षा अधिक नसावा. ही मर्यादा ओलांडणारे फटाके बेकायदेशीर मानले जातील आणि त्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल.
advertisement
साखळी फटाक्यांवर बंदी:
100 पेक्षा जास्त साखळी फटाके (लडी) असलेले फटाके पूर्णपणे बंदीस्त आहेत. अशा प्रकारचे फटाके ध्वनी प्रदूषणाचे मुख्य कारण ठरतात, त्यामुळे त्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
शांतता क्षेत्रातील नियम:
शाळा, रुग्णालय, न्यायालय, धार्मिक स्थळे किंवा सरकारी कार्यालयांच्या परिसरापासून 100 मीटर अंतरात कोणत्याही प्रकारचे फटाके फोडणे सक्त मनाई आहे. या ठिकाणी फटाके फोडल्यास केवळ दंडच नव्हे, तर गुन्हा दाखल होऊ शकतो.
advertisement
सार्वजनिक ठिकाणांवरील निर्बंध:
रस्ते, पूल, घाट, सेतू किंवा सार्वजनिक मार्गांवर फटाके फोडणे बंद असेल. वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी किंवा गर्दीच्या भागात फटाके फोडल्यास पोलिस तत्काळ कारवाई करतील. 10 मीटर परिसरात फटाके फोडणे सुद्धा प्रतिबंधित आहे.
पुणेकरांसाठी आवाहन
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की दिवाळीचा आनंद घेताना पर्यावरणाची काळजी घ्यावी. मुलांना फटाके फोडताना मोठ्यांनी सोबत राहावे तसेच ध्वनी मर्यादा आणि वेळेचे पालन करावे. रात्री उशिरा फटाके फोडल्यास ध्वनी प्रदूषणासोबत वृद्ध आणि रुग्णांना त्रास होतो. पुणे पोलिसांचे म्हणणे आहे की, ''दिवाळी आनंदाची असली तरी ती सुरक्षित आणि शांततेने साजरी होणे अधिक महत्त्वाचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पर्यावरण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.''
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 12:47 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या! दिवाळीत 'या' फटाक्यांवर संपूर्ण बंदी; आदेश मोडल्यास... पुणे पोलिसांचा सज्जड इशारा