सांगली: महाशिवरात्रीच्या निमित्ताने सांगलीत गेल्या तीन वर्षांपासून द्राक्ष दिन साजरा केला जातोय. फार्मर प्रोडूसर कंपन्या आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. द्राक्ष दिनाची संकल्पना आणि उद्देश लोकल 18 ने विजय कुंभार यांच्याकडून जाणून घेतली.
महाशिवरात्री हा द्राक्ष दिन म्हणून साजरा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम केवळ एक सण म्हणून नाही, तर शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि द्राक्ष शेतीला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
advertisement
देवाला वाहतात फळे
देव-देवतांना श्रीफळ किंवा नारळ वाहण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे ज्या-त्या हंगामाप्रमाणे पिकणारी फळे देखील वाहण्याची प्रथा आहे. उदा. अक्षय तृतीयेला आंबा असो किंवा संक्रातीला गाजर. शिव-पार्वतीच्या लग्नाचे स्मरण म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकराची उपासना केली जाते. यानिमित्ताने फळे खाऊन किंवा शिवलिंगावरती फळे अर्पण करून अनेक भक्त शिवरात्री साजरी करतात.
कोल्हापूरचं अख्खं मार्केट जाम, 25 खोक्यांचा 'आमदार' पाहिलात का?
यंदा साडेतीनशेहून अधिक ठिकाणी होणार द्राक्षदिन
यश द्राक्ष नगरी फार्मर प्रोड्यूसर कंपनीने हा उपक्रम महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या मदतीने अधिक व्यापक करण्याचा संकल्प केला आहे. यंदा महाराष्ट्रातील 350 हून अधिक ठिकाणी हा दिवस द्राक्ष दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
या उपक्रमाचा विस्तार परळी वैजनाथ, शिखर शिंगणापूर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, रेवणसिद्ध, दंडोबाचा डोंगर आणि इतर अनेक तिर्थस्थळांवर होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व शेतकरी आपल्या गावातील मंदिराबाहेर द्राक्ष विक्री करून या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
विजय कुंभार यांच्या मते, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला संपूर्ण देशभरामध्ये जिलेबी खाऊन राष्ट्रीय सणांचा आनंद साजरा केला जातो. त्याचप्रमाणे महादेवाच्या आवडीचे द्राक्षफळ खाऊन लोकांनी महाशिवरात्री साजरी करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराबाहेर थेट शेतकऱ्यांकडून गोड, ताजी द्राक्षे स्वस्त दरात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातात.
महाशिवरात्रीला केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटकच नाही, तर संपूर्ण भारतभर हा द्राक्ष दिन पोहोचवायचा आहे. परंपरेच्या माध्यमातून बाजारपेठ निर्माण करून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे, हाच आमचा उद्देश आहे, असे विजय कुंभार यांनी पुढे सांगितले. तुम्हीही तुमच्या गावातील मंदिराबाहेर द्राक्ष विक्रीत सहभागी व्हा आणि महाशिवरात्री द्राक्ष दिन ही चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी लोकल 18 शी बोलताना केले.
महाशिवरात्रीच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी द्राक्ष खावीत आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशाने हा दिन साजरा करण्यात येतोय. अनेक संकटांचा सामना करून द्राक्ष उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देणारा हक्काचा एखादा दिवस असावा या हेतूनेच द्राक्ष दिन साजरा होत आहे.