जानला: शेती बेभरवशाची असल्याने अनेकजण जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. गेल्या काही काळात दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे येत होते. परंतु, आता दुधाच्या दरात मोठी कपात झालीये. त्याचा फटका दुग्ध व्यवसायिकांना बसत असून शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. तर खाद्याचे वाढते भाव आणि इतर खर्चामुळे काही शेतकऱ्यांवर हा व्यवसायच बंद करण्याची वेळ आलीये. याबाबतच जालना येथील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा लोकल18 सोबत बोलताना मांडल्या आहेत.
advertisement
दुधाचे दर घसरले
जालना जिल्ह्यातील दहिफळ येथील दूध संकलन केंद्रावर वर्षभरापूर्वी 25 ते 30 शेतकरी आपलं दूध घेऊन यायचे. आता ही संख्या केवळ 8 ते 10 शेतकऱ्यांवर आलीये. अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा दुग्ध व्यवसाय बंद केला आहे. गायीच्या दुधाला वर्षभरापूर्वी 35 ते 40 रुपये प्रति लिटर असा दर मिळायचा तर म्हशीच्या दुधाला 70 ते 80 रुपये प्रति लिटर असा दर मिळत होता. आता गाईच्या दुधाला 17 ते 31 रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधाला 40 ते 60 रुपये प्रति लिटर असा भाव मिळतोय.
12 वी झाली अन् घेतली म्हैस! घरातूनच करतोय लाखात कमाई, शेतकऱ्याच्या पोराचा नादच खुळा!
पशुखाद्य महागलं
एकीकडे दुधाच्या दरात घसरण होत असताना पशुखाद्याचे दर मात्र लक्षणीय रित्या वाढत आहेत. वर्षभरापूर्वी 50 किलो पशुखाद्य विकत घेण्यासाठी 1400 ते 1500 रुपये खर्च करावे लागायचे. आता मात्र 50 किलो पशुखाद्य विकत घेण्यासाठी 2 हजार रुपयांच्या आसपास खर्च येत आहे. या परिस्थितीत दुग्ध व्यवसाय सांभाळणे अनेक शेतकऱ्यांना कठीण जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपली जनावरे विकून दुग्ध व्यवसाय बंद केला आहे. तर अनेक शेतकरी खिशातून पैसे टाकून दुग्ध व्यवसायाला टिकवून ठेवत आहेत, असे दुग्ध व्यवसायिक सांगतात.
दुधापेक्षा पाणी महाग
“मी 4-5 वर्षांपूर्वी दोन गाईंपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. आता माझ्याकडे 7 गाई आहेत. दुधाच्या दरात होत असलेली घसरण आणि पशुखाद्य दरात होत असलेली वाढ यामुळे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पूर्वी मिळणारा नफा आता फक्त 10 टक्क्यांवर आला आहे. त्यात जनावरं आजारी पडले तर आम्हाला खिशातील पैसे खर्च करून त्याला बरं करावं लागतंय. शहरात गेल्यानंतर एक लिटरची पाणी बॉटल 20 रुपये देऊन खरेदी करावी लागते. मात्र आमच्या दुधाला 18 ते 20 रुपये प्रति लिटर असा दर मिळत आहे. पाण्यापेक्षा आमच्या दुधाची किंमत कमी असल्याची खंत नारायण चौधरी यांनी व्यक्त केली.
अनुदान मिळालं नाही
सध्या दुधाला भाव नसल्याने दुग्ध शेतकरी आणि दुग्ध व्यवसायिक संकटात आहेत. सरकारने 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी आमच्यापैकी एकाही शेतकऱ्याला अनुदान मिळालेले नाही, असं दुग्ध व्यवसायिक अमर काळे यांनी सांगितलं.





