जानला: उष्णतेचा कडाका वाढल्याने थंड पेयांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारामध्ये लिंबांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लिंबाचे दर देखील 150 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत. जालन्यातील भाजी मंडीमध्ये 10 ते 15 रुपयांना 2 नग लिंबू मिळत आहेत. आगामी काळामध्ये उष्णता आणखी वाढणार आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लिंबाचे दर हे किरकोळ बाजारात 200 रुपये प्रति किलो पर्यंत जातील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
advertisement
लिंबू खातोय भाव
जालना शहरातील भाजी मंडी मध्ये शहराच्या आसपासच्या गावातून लिंबाची आवक होत आहे. लिंबाची आवक मर्यादित असल्याने लिंबाला चांगली मागणी आहे. आठ दिवसांपूर्वी लिंबाचे दर हे 150 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले होते. परंतु ते आता 120 ते 130 रुपये प्रति किलो आहेत. हेच दर किरकोळ बाजारात सध्या 150 ते 160 रुपये प्रति किलो आहेत. आगामी काळामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लिंबांना मोठी मागणी वाढणार आहे. त्यामुळे ठोक बाजारात लिंबू 150 ते 160 रुपये प्रति किलो पर्यंत विक्री होऊ शकते. तर किरकोळ बाजारात हेच दर 180 ते 200 रुपये प्रति किलो असतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितलं.
तरुण शेतकऱ्याची शेती भारीचं, एक एकर मधून कमवला 3 लाखांचा नफा, असं काय केलं?
शेतकरी समाधानी
लिंबाला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकरी समाधानी आहेत. शेतकरी विकास आटोळे यांच्याकडे 300 लिंबूनिची झाडे आहेत. ते दररोज एक ते दोन गोणी बाजार समितीमध्ये विक्रीला घेऊन येतात. या लिंबांना 120 ते 130 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. रमजान महिना आणि वाढलेली उष्णता यामुळे लिंबाचे दर टिकून असल्याचं विकास आटोळे यांनी सांगितलं. त्याचबरोबर आगामी काळामध्ये लिंबाला 150 ते 160 रुपये प्रति किलो असा दर मिळण्याची अपेक्षा असल्याचंही आटोळे सांगतात.
दरम्यान, उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या थंड पेयामध्ये लिंबाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. लिंबू हे शरीराला थंडावा देणारे आहे. अनेक जण लिंबू सरबत बरोबरच विविध माध्यमातून लिंबू सेवनाला प्राधान्य देत असतात. त्यामुळे बाजारात लिंबाची मागणी वाढवू दर देखील वधारतात. याचा प्रत्यय यंदाच्या उन्हाळ्यात देखील येत आहे. आगामी काळामध्ये 200 रुपये प्रति किलो एवढ्या दराने लिंबू खरेदी करावे लागल्यास आश्चर्य वाटू नये.