शिवार फाउंडेशनचे संस्थापक विनायक हेगाणा यांनी सांगितले की, कर्जाचे ओझे, पिकांचे नुकसान आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावर आलेल्या शेतकऱ्यांना थांबवण्याचे आणि त्यांना नव्या उमेदीने उभे करण्याचे काम आम्ही करत आहोत. या हेल्पलाइनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ समुपदेशनच नव्हे, तर आर्थिक मार्गदर्शन, शिक्षणाची मदत आणि शेतीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचीदेखील सुविधा पुरवली जाते.
Success Story : शिक्षण बारावी पास, तरुण करतोय सोडा विक्री व्यवसाय, महिन्याला 4 लाखांची उलाढाल
advertisement
ही शिवार हेल्पलाइन 2017 मध्ये सुरू करण्यात आली. सुरुवातीला काही निवडक जिल्ह्यांमध्ये जनजागृती कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला जात होता. त्या वेळी शेतकरी हे वैयक्तिकरित्या विनायक हेगाणा यांच्याशी संपर्क साधत. या संवादातूनच हेल्पलाइनची संकल्पना आकाराला आली. गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत 10734 हून अधिक कॉल्स हेल्पलाइनवर आले आहेत आणि त्यांना मदत केली आहे. या माध्यमातून 198 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश मिळाले आहे.
या वर्षी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हेल्पलाइनचे काम आणखी वाढले आहे. केवळ मागील महिन्यातच 8934 शेतकऱ्यांनी मदतीसाठी संपर्क साधला, तर त्यापैकी अनेकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि मदत मिळाली. फाउंडेशनने 2200 हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली असून, 268 शेतकऱ्यांना गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या बियाण्यांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय पूरग्रस्त भागांतील 8500हून अधिक शेतकऱ्यांपर्यंत थेट मदत पोहोचवण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत आज 31 जिल्ह्यांमध्ये हेल्पलाइनचे जाळे विस्तारले आहे.
विनायक हेगाणा सांगतात, आमच्या टीममधील सर्व स्वयंसेवक हे शेतकऱ्यांचीच मुले आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी, भावनिक संघर्ष आणि शेतीतील तांत्रिक अडथळे नीट समजतात. कॉल आल्यानंतर प्रथम समुपदेशन केले जाते. त्यानंतर त्या शेतकऱ्यांची परिस्थिती, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक गरज यांचा तपशील घेऊन मदत केली जाते. सध्या पाच स्वयंसेवकांची टीम या कार्यात दिवस-रात्र गुंतलेली आहे.
हेगाणा यांनी समाजातील दानशूर नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे. त्याची साथ सोडली तर देशाची पायाभरणी कोसळेल. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेले पाहिजे.
शिवार फाउंडेशनचे हे कार्य आज हजारो शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण बनले आहे. नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटातही नव्याने उभे राहण्याची प्रेरणा या हेल्पलाइनने दिली आहे. अतिवृष्टीने त्रस्त शेतकऱ्यांना मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक पाठबळ देत ‘शिवार हेल्पलाइन’ ही खरीच ग्रामीण महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरली आहे.





