दरवर्षीची तरतूद यंदा वेळेत
परदेश दौर्यासाठी राज्य सरकार दरवर्षी 2 कोटींची तरतूद करते. मात्र, ही रक्कम मार्च महिन्यात, आर्थिक वर्षाच्या शेवटी वितरित केली जात असल्याने प्रत्यक्ष दौरे नियोजित करता येत नव्हते. यंदा या निधीपैकी 1.20 कोटी खर्च करण्यास मंजुरी मिळाल्यामुळे कृषी विभागाने लगेच तयारीला सुरुवात केली आहे.
170 शेतकरी परदेश दौऱ्यावर जाणार
advertisement
कृषी आयुक्तालयाने सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना प्रत्येकी 5 शेतकऱ्यांची निवड करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यापैकी, 3 शेतकरी सर्वसाधारण गटातून, 1 पुरस्कारप्राप्त शेतकरी, 1 महिला शेतकरी ही पाचही नावे 5 ऑगस्ट 2025 पर्यंत कृषी आयुक्तालयाकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातून एकूण 170 शेतकरी, त्यात 34 महिला व 34 पुरस्कारप्राप्त शेतकरी दौऱ्यासाठी पात्र ठरणार आहेत.
या देशांमध्ये होणार अभ्यासदौरा
राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक स्तरावर आधुनिक शेतीतंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, जैविक शेती आणि यांत्रिकीकरणाचे ज्ञान मिळावे, यासाठी दौऱ्यात यंदा युरोप, इस्त्राईल, जपान, चीन, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश करण्यात आला आहे.
महिला शेतकऱ्यांना दिली संधी
यंदा महिलांना प्रथमच प्रतिनिधित्व देण्यात येत आहे. मागील निकषांमध्ये बारावी उत्तीर्ण असणे व वयोमर्यादा 25 ते 60 वर्षे होती.आता या अटी शिथिल करण्यात आल्या असून किमान शिक्षणाची अट देखील रद्द केली आहे. कमाल वयोमर्यादा (60 वर्षे) काढून टाकली आहे. मात्र,किमान वय २५ वर्षे आवश्यक आहे. या बदलांमुळे शेतमजुरीवर आधारित महिलांपासून ते अनुभवी महिला शेतकरी देखील सहभागी होऊ शकणार आहेत.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती आणि उत्पादनवाढीबाबत थेट अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः महिलांना यात दिलेले स्थान हे ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. निधी वेळेत मंजूर झाल्याने यंदाचा परदेश दौरा निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास कृषी विभाग व्यक्त करत आहे.