इनाम जमीन म्हणजे काय?
इनाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला शासनाकडून विशेष कारणास्तव दिलेली जमीन होय.जुन्या काळात ही जमीन मंदिर, मठ, देवस्थान किंवा सेवेसाठी दिली जात असे. इनाम जमिनी कायमस्वरूपी मालकी हक्कासारख्या नसतात. त्यावर शासनाचा ताबा राहतो. अशा जमिनींचा उपयोग ठराविक उद्देशासाठीच करायचा असतो. उदाहरणार्थ,देवस्थान इनाम जमीन देवस्थानाच्या उपयोगासाठी.
वतन जमीन म्हणजे काय?
advertisement
वतन जमिनी या पूर्वीच्या काळात एखाद्या गावात विशिष्ट पदावर असणाऱ्या व्यक्तींना मिळायच्या. जसे की, गाव कामगार, जोशी, कुलकर्णी, देशमुख, पाटील अशांना त्यांच्या पदाच्या मोबदल्यात ही जमीन मिळायची. याला वतन जमीन म्हटले जात असे. याही जमिनी कायमस्वरूपी वैयक्तिक मालकी नसून "वतन" या पदाशी जोडलेल्या असतात.
अशा जमिनींचा वापर शेतीसाठी करता येतो का?
कायदेशीर परवानगीशिवाय थेट वापर शक्य नाही. इनाम व वतन जमिनी या खास कायद्यांखाली येतात. त्यामुळे या जमिनींचा सरळसोट खरेदी-विक्री व्यवहार किंवा शेतीसाठी वापर करणे बेकायदेशीर ठरू शकते.
जमीन रूपांतर करावी लागते
जर कोणाला अशी जमीन शेतीसाठी वापरायची असेल, तर प्रथम शासनाकडे अर्ज करून ती जमीन "फ्री होल्ड" (स्वत:च्या मालकीची जमीन) म्हणून रूपांतरित करावी लागते. त्यासाठी काही शुल्क व दंड शासनाकडे भरावा लागतो.
वापरावर मर्यादा
इनाम जमीन देवस्थानासाठी दिलेली असल्यास ती शेतीसाठी वापरण्याची मुभा मिळत नाही. तसेच वतन जमिनीही थेट शेतीसाठी वापरता येत नाहीत. वापरासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते.
शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावे?
अशा जमिनी विकत घेताना किंवा भाड्याने घेताना दस्तऐवज नीट तपासावेत. सातबारा उताऱ्यावर "इनाम" किंवा "वतन" असे उल्लेख आढळल्यास सावध राहणे आवश्यक आहे. जमीन वापरायची असल्यास महसूल खात्याशी संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी इनाम व वतन जमिनींबाबत सुधारणा कायदे केले आहेत. काही प्रकरणांत दंड भरून त्या जमिनी फ्रीहोल्ड करून घेण्याची मुभा दिली आहे. यामुळे अशा जमिनींचा योग्य वापर करून त्यावर शेती करता येते. मात्र, थेट बिनपरवानगी शेती करणे किंवा खरेदी-विक्री करणे धोकादायक ठरू शकते.
थोडक्यात, इनाम व वतन जमिनी या शासनाकडून विशिष्ट उद्देशाने दिलेल्या असल्याने त्यांचा सरळसोट शेतीसाठी वापर करता येत नाही. पण योग्य कायदेशीर प्रक्रिया आणि शासनाची परवानगी घेतल्यास अशा जमिनी शेतीसाठी वापरणे शक्य आहे.