बैलांची सजावट आणि पूजन
बेंदूरच्या दिवशी गाय-बैलांना अंघोळ घालून स्वच्छ करून त्यांची खास सजावट केली जाते. शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल, कड्या, घुंगरू, हार, काजळ, आणि रंगीत कपडे घालून त्यांना आकर्षक रूप दिले जाते. याशिवाय, घरात मातीचे बैल बनवले जातात, आणि त्यांचेही विधिपूर्वक पूजन केले जाते. हरभऱ्याची डाळ आणि गूळ वापरून तयार केलेले कडबोळे मातीच्या बैलांच्या शिंगांवर ठेवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो.
advertisement
बाजारात खरेदीचा उत्साह
सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी येऊन बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यात मातीचे बैल, झूल, सजावटीचे साहित्य, झेंडे, घंटा, मिरवणुकीसाठी ध्वज यांचा समावेश असतो. शहरी भागात देखील मातीच्या बैलांची पूजा केली जाते, त्यामुळे शहरांमध्ये देखील बैलजोड्यांच्या विक्रीसाठी बाजार गजबजलेले दिसले.
महागाई असूनही उत्साह कायम
यंदा सर्वच पूजन व सजावटीच्या वस्तूंमध्ये किंमतींमध्ये वाढ झाली आहे. मात्र, शेतकरी व नागरिकांचा उत्साह कमी झालेला नाही. पारंपरिक सणाला शोभेसाठी लोकांनी भरभरून खरेदी केली. अनेक ठिकाणी बालगोपाळांनी देखील मातीच्या बैलजोड्या विकत घेऊन त्या सजवण्याचा आनंद लुटला.
पोळा व बेंदूर : एकच श्रद्धा, विविधता फक्त नावात
बेंदूर आणि पोळा या दोन्ही सणांमध्ये साजरा करण्याची पद्धत साधारण सारखीच असते. काही भागात याला बेंदूर म्हटले जाते, तर काही ठिकाणी पोळा. पण दोन्ही सणांचा केंद्रबिंदू बैल हेच असून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना समान असते.
दरम्यान, बेंदूर सण शेती संस्कृतीशी जोडलेला एक महत्त्वाचा भाग आहे. बैल हे केवळ जनावर नसून शेतकऱ्याच्या संसारातील एक कुटुंबसदस्य म्हणून त्यांचं स्थान आहे. त्यांच्या कष्टांना सलाम करण्यासाठी आणि परंपरेला जपण्यासाठी हा सण दरवर्षी उत्साह, श्रद्धा आणि प्रेमाने साजरा केला जातो.