काय आहे ‘संरक्षित कुळ’?
‘संरक्षित कुळ’ म्हणजे असे व्यक्ती जे वर्षानुवर्षे इतर जमिनीधारकांच्या जमिनीवर शेती करत आहेत आणि ज्यांनी कुळ म्हणून नोंदणी करून घेतली आहे. 1 एप्रिल 1957 पूर्वीपासून जी व्यक्ती कोणत्याही जमिनीवर शेती करत होती आणि त्याची नोंद ‘कुळ’ म्हणून सातबाऱ्यावर आहे, त्यांना संरक्षित कुळाचा दर्जा दिला जातो. यामुळे त्यांना त्या जमिनीचा मालकी हक्क मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो.
advertisement
कुळ म्हणून नोंदणी का गरजेची?
जर कुळाची नोंद सरकारी अभिलेखात (7/12 उतारा) नसेल, तर त्या व्यक्तीला कुळ हक्क सांगता येत नाही. त्यामुळे ज्या कुळांनी अजूनही नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. ही नोंदणी केल्यानंतर, ते पुढे मालकी हक्कासाठी अर्ज करू शकतात.
संरक्षित कुळ मिळवण्यासाठी काय करावे?
1) फॉर्म ‘K’ भरावा लागतो
तुम्हाला संरक्षित कुळ म्हणून नाव नोंदवायचं असल्यास महसूल विभागाच्या कार्यालयात फॉर्म 'K' सादर करावा लागतो. हा अर्ज तहसीलदार किंवा जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयात दिला जातो.
2) पुरावे सादर करा
कुळ म्हणून ओळख मिळवण्यासाठी खालील पुरावे जोडले जातात. जसे की,
7/12 उताऱ्यावर नाव असलेला उतारा (शेती करत असल्याचे पुरावे)
जमीनधारकाच्या मंजुरीची प्रत (जर असेल तर)
जमीन खरेदीविक्री संबंधित कोणतेही व्यवहार झाले नसल्याची खात्री
उत्पन्नाचे दाखले / पिक नोंदणी
3) तपासणी व सुनावणी
तहसील कार्यालय अर्जाची तपासणी करून प्रत्यक्ष शेतात पाहणी करते. संबंधित जमिनीवर शेती करणाऱ्याचे प्रत्यक्ष सत्यापन होते. तसेच जमीनधारक आणि कुळ यांच्यातील संबंध कायद्यानुसार स्पष्ट करण्यात येतो.
4)फैसला व आदेश
तपासणी व पुरावे योग्य आढळल्यास तहसीलदार संरक्षित कुळाचा दर्जा देण्याचा आदेश देतो. त्यानंतर संबंधित नोंद सातबारा उताऱ्यावर घेतली जाते.
मालकी हक्क कसा मिळतो?
कुळ हा एकदा संरक्षित म्हणून नोंदवला गेला की, त्याला मालकी हक्क घेण्यासाठी प्रचलित बाजारभावानुसार ठराविक रक्कम शासनाकडे भरावी लागते. त्यानंतर जमिनीचा मालकी हक्क त्याच्या नावे सातबाऱ्यावर दाखवला जातो.
महत्त्वाचे नियम काय?
कुळाचे नाव 1957 पूर्वीपासून सातबाऱ्यावर असल्यास त्याला थेट संरक्षण मिळते.
कुळाने जमीन कायमस्वरूपी विकत घेतली असल्यास त्याला पुनर्विक्री करण्यासाठी तहसीलदाराची परवानगी घ्यावी लागते. कुळ ही जागा बिगर-कृषिक कामासाठी वापरू शकत नाही, जोपर्यंत परवानगी मिळत नाही.
दरम्यान, संरक्षित कुळ म्हणून नोंदणी करणे ही शेतमजुरासाठी मालकी हक्क मिळवण्याची पहिली पायरी आहे. शासनाने दिलेली ही संधी गरीब, भूमिहीन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे शेतमजूर वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो आणि जमिनीवरील हक्कही सुरक्षित होतात.